Fruits Rate : व्रतवैकल्याच्या दिवसात फळांचे दर महागले | पुढारी

Fruits Rate : व्रतवैकल्याच्या दिवसात फळांचे दर महागले

नवी मुंबई : पुढारी वार्ताहर
थंडीचा हंगाम सुरू झाला आहे आणि वातावरणही आल्हाददायक झाले आहे. त्यामुळे आता भाजीपाला आणि फळांचेही चांगले उत्पादन होऊ लागले आहे. परिणामी बाजारात उत्तम दर्जाचा भाजीपाला आणि फळे दिसू लागली आहेत. त्यातच मार्गशीर्ष महिना सुरु असल्याने उपवास धरणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात फळांची आवक सुरू झाली आहे. मागणी वाढल्याने फळांच्या दरात (Fruits Rate) ३० ते ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. ही आवक आणखी महिनाभर कायम राहणार असून दरही कायम राहणार आहेत.

मार्गशीर्ष महिन्यात महिलावर्गांचे उपवास सुरू होत असल्याने भाजीपाल्याबरोबरच फळांनादेखील मागणी वाढते. त्यानुसार हा महिनाभर बाजारात फळांची आवक वाढत असते. उपवासासाठी आणि पूजेसाठी फळांना विशेष मागणी असते. त्यानुसार आता फळ बाजार विविध प्रकारच्या फळांनी सजले आहेत. बाजारात सर्व प्रकारची देशी फळे मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.

 ५ फळांना पसंती

किरकोळ बाजारात फळांचे दर किलोमागे १० ते ३० रुपयांनी वाढलेले आहेत. किरकोळ बाजारात पूजेसाठी पाच फळांना विशेष मागणी आहे. शंभर रुपयांना पाच या दराने ही फळे मिळत आहेत. किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपये डझन असणारी केळी आता ५० ते ६० रुपये डझन झाली आहेत.

उपवासाचा मार्गशीर्ष महिना सुरू असल्याने बाजारात फळांना मागणी आहे. त्यानुसार आवक वाढली असून फळांचे दरही वाढले आहेत. आता या महिनाभर ही दरवाढ राहणार आहे. – दिलीप खोत, फळ व्यापारी

आवक वाढल्याने उत्साह

बाजारात संत्री, मोसंबी, पेरू, सीताफळ, द्राक्षे, सफरचंद, पपई, कलिंगड, अननस यांसारख्या देशी फळांची आवक वाढायला सुरुवात झाली आहे. त्यांना चांगली मागणी असल्याने गेले काही दिवस थंडावलेल्या बाजारात आता पुन्हा उत्साह निर्माण झाल्याचे चित्र आहे.

Fruits Rate : फळांचे दर

संत्री ५० ते ७० रु
मोसंबी ६० ते ९० रु
पेरू ६० ते ८० रु
सीताफळ ५० ते १०० रु
सफरचंद ६० ते ८० रु
पपई १० ते १५ रु
कलिंगड १५ ते १७ रु
अननस १५ ते २० रु

हेही वाचा 

Back to top button