राज्यात थंडीचा पारा सरासरीच्या ३.३ अंशाने कमी; पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव वाढणार | पुढारी

राज्यात थंडीचा पारा सरासरीच्या ३.३ अंशाने कमी; पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव वाढणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव वाढत आहे. हिमालयीन भागात एक डिसेंबरपासून हा चक्रवात पूर्णपणे सक्रिय होणार आहे. परिणामी, राज्याच्या सर्वच भागांत डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढणार आहे. दरम्यान, बुधवारी राज्यात थंडीचे प्रमाण वाढले असून, किमान तापमानाचा पारा सरासरीच्या ३.३ अंश कमी झाला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २ आणि ३ डिसेंबर रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे. राज्यात बुधवारी सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया येथे ११.९ अंश झाली.

कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणातील ४ जिल्ह्यांत आकाश काहीसे ढगाळलेले असले, तरी किमान तापमानसुद्धा सरासरीपेक्षा १ ते २ डिग्रीने खालावलेलेच असेल. त्यामुळे पुढील ४ दिवस साधारण थंडीबरोबर तुरळक ठिकाणी अगदीच किंचित किरकोळ पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.

दक्षिण मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या सहा जिल्ह्यांत पुढील ३ दिवस किमान तापमान सरासरीपेक्षा २-४ डिग्रीने वाढलेले असल्यामुळे विशेष थंडी जाणवणार नाही. उर्वरित मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या ४ जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भ व मराठवाड्यात ३० नोव्हेंबरपासून आठवडाभर साधारण थंडी जाणवेल, असा अंदाज आहे.

Back to top button