भारत-अमेरिका युद्ध सरावाने चीनचा जळफळाट; अमेरिकेला दमबाजी | पुढारी

भारत-अमेरिका युद्ध सरावाने चीनचा जळफळाट; अमेरिकेला दमबाजी

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था :  भारतीय आणि अमेरिकन लष्कराचा भारतातील चीन सीमेवर युद्ध सराव जोमात सुरू असताना चीनचा जळफळाट सुरू असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतील ‘पेंटॅगॉन’च्या अधिकार्‍यांनी भारत-चीन विषयात नाक खुपसू नये, असा इशारा चीनने दिला आहे. दस्तुरखुद्द ‘पेंटॅगॉन’नेच याबाबतची माहिती दिली आहे.

महत्त्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनबाबत घेतलेल्या स्पष्ट भूमिकेनंतर चीनही भारत सीमेवरील तणाव कमी करू इच्छित असल्याचे ‘पेंटॅगॉन’ने म्हटलेले आहे. भारत आणि अमेरिकेत जवळीक चीनला नको आहे. चीनमधून भारताला होणारी निर्यात मोठी आहे. गलवान हिंसक संघर्षानंतर भारत सरकारने चीन तसेच चिनी कंपन्यांवर आधीच अनेक प्रकारचे निर्बंध लादलेले आहेत. भारताने चीनसोबतचा व्यापारच बंद केल्यास त्याचा चीनला मोठा फटका बसणार आहे.

चीनकडे 2035 पर्यंत 1,500 आण्विक शस्त्रे

चीनकडे 2035 पर्यंत 1,500 आण्विक शस्त्रे असतील, असा अंदाजही ‘पेंटॅगॉन’ने एका अहवालातून वर्तविला आहे. सध्या चीनकडे 350 आण्विक शस्त्रे आहेत. आजघडीला रशियाकडे सर्वाधिक अण्वस्त्रे असून, त्यांची संख्या 5 हजार 977 आहे, त्याखालोखाल अमेरिकेकडे 5 हजार 428 आण्विक शस्त्रे आहेत. भारताकडे 159 आण्विक शस्त्रे आहेत. गतवर्षी चीनने जगात सर्वाधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या. चीनचे हे धोरण अमेरिकेसाठी चिंताजनक असल्याचे ‘पेंटॅगॉन’ने म्हटले आहे. एका अधिकृत माहितीनुसार, जगातील 9 देशांकडे आण्विक शस्त्रे आहेत. यामध्ये भारतासह अमेरिका, रशिया, चीन, बि—टन, फ्रान्स, पाकिस्तान, इस्रायल आणि उत्तर कोरियाचा समावेश आहे. या देशांकडे एकूण 12 हजार 705 आण्विक शस्त्रे आहेत.

Back to top button