भाजपकडून राज्यात दंगल घडविण्याचे षडयंत्र : भास्कर जाधव यांचा खळबळजनक आरोप | पुढारी

भाजपकडून राज्यात दंगल घडविण्याचे षडयंत्र : भास्कर जाधव यांचा खळबळजनक आरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ऋतुजा लटके निवडून आल्या तेव्हाच भाजपला त्यांची ताकद किती आहे, हे कळले. आपण निवडणुका जिंकू शकत नाही, हे भाजपला कळले आहे. त्यामुळेच आगामी काळात भाजपकडून राज्यात दंगल घडविण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची शक्यता असल्याचा आरोप शिवसेना उपनेते तथा माजी मंत्री भास्कर जाधव यांनी केला.

नाशिक येथे दौऱ्यावर आलेल्या आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने महापुरुषांचा अपमान करत आहे. हिवाळी अधिवेशनात खूप सारे विषय असून, भाजप, शिंदे गटाला त्याबद्दल जाब विचारला जाणार आहे. अनेक उद्योग राज्याबाहेर गेले. यासंदर्भात युवानेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. नोकरभरतीचा खेळखंडोबा सुरू असल्याचा आरोप करत कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नी या सरकारला जाब विचारला जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

स्वायत्त संस्थांचा वापर राजकारणासाठी होत आहे. या सगळ्या संस्था कुणाच्या तरी राजकीय दावणीला बांधल्यासारखे काम करत असल्याचा आरोप करत न्यायालयात सुनावणीसाठीही ‘तारीखवर तारीख’ पडत असल्याबाबत भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबई महापालिकेतील अनेक अधिकाऱ्यांच्या बेछूट बदल्या केल्या जात असल्याने सगळा अनागोंदी कारभार सुरू आहे. तुकाराम मुंढे नेहमी वादात असतात. त्यामुळे यांना फार महत्त्व देऊ नये, असे मत जाधव यांनी मांडले.

म्हणून मुख्यमंत्री समोर येत नाही

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्योग राज्याबाहेर गेल्या प्रकरणी व्यासपीठावर येण्याचे आव्हान दिले आहे. आपले पितळ उघड पडेल म्हणून ते समोर येत नसल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला. नारायण राणे यांच्याबद्दल काहीच न बोलण्याचे मी ठरविले आहे. त्यांना गेल्या चार-पाच वर्षांत कधीही सभेला बोलावलेले नाही. ते केवळ पत्रकार परिषदाच घेतात. त्यांच्या बोलण्याला काहीच किंमत नसते, असा टोला त्यांनी राणेंना लगावला.

हेही वाचा :

Back to top button