'खरा मित्र' हीच 'संपत्ती', वेळीच ओळखून मैत्री जपा, याची जाणीव करून देणारा Fortune! | पुढारी

'खरा मित्र' हीच 'संपत्ती', वेळीच ओळखून मैत्री जपा, याची जाणीव करून देणारा Fortune!

Kkhushi Niramish : तुमच्या आयुष्यात तुमची खरी संपत्ती कोणती हे जर तुम्हाला विचारले तर प्रत्येकाची उत्तरे वेगवेगळी निश्चितच असतील. मात्र, त्यापैकी अनेक जण ‘मैत्री आणि नाती हीच खरी संपत्ती’, असे मत व्यक्त करतील. Fortune हा चित्रपट दोन मित्रांच्या कथेच्या माध्यमातून आपल्याला हेच सांगू इच्छितो.

Fortune हा ताजिकिस्तानचा चित्रपट. इफ्फीमध्ये नुकताच तो दाखवला गेला. चित्रपटातील दोघांच्या मैत्रितील ओलावा, एकमेकांप्रती असणारी काळजी त्यासाठी कोणताही त्याग करण्याची तयारी मात्र नंतर अचानक मिळालेल्या बक्षीसातून दोघांमध्ये निर्माण झालेला दुरावा आणि तरीही टिकून राहिलेली मैत्रिची भावना या सर्व गोष्टींचा पट अतिशय उत्कृष्ट दाखवला आहे. तर शेवटच्या क्षणी एकाचा मृत्यू आणि हट्टापायी मित्र गमावल्याचे दुःख हे सर्व मनाला चित्रपटात गुंतून राहण्यास भाग पाडतात.

ताजिकिस्तान हा रशियातून वेगळा होण्याच्या प्रयत्नात आहे. तर रशिया हे टाळण्याच्या प्रयत्नात आहे. या वातावरणात दोन वयस्कर आणि जवळपास सारखीच आर्थिक परिस्थिती असणा-या काहूर आणि मानून या मित्रांची ही कथा आहे.

काहूर आणि मानून दोघांनाही संगीत फार आवडते. सुफी संगीताच्या स्पर्धेत त्यांना नाव आजमावयाचे असते. मात्र, त्याचवेळी रशियातून विभक्त होऊन स्वतंत्र होऊ पाहणा-या ताजिकिस्तानात रशियाकडून हे सर्व थांबवण्यासाठी अनेक कडक निर्बंध लादण्यात येतात. अशाच एका प्रसंगी जेव्हा काहुरला संधी मिळते. मात्र, मानून मुळे ही संधी गमावली जाते. याचे मानूनला कायम दुःख वाटत राहते. काहुरला त्यापेक्षाही जास्त मानूनची मैत्री महत्वाची असते आणि तो हेच त्याला समजावून सांगत असतो. त्याचवेळी तो आपलं स्वप्न आपला मुलगा पूर्ण करेल जो सध्या रशियात शिकत आहे. त्यासाठी तो जिवापाड मेहनत करतो. तर त्याचा मोठा मुलगा हा फक्त टॅक्सी चालवतो.

तर दुसरीकडे मानूनला मुलगी असते. मात्र, ती खूपच आजारी असते. तिच्या आजारामुळे त्याला काहुरपेक्षाही जास्त पैशांची सतत गरज भासते. काहुर आपल्या मित्रासाठी अनेकदा आपण बचत केलेल्या पैशांनी मदत करतो. त्यामुळे मानूनला नेहमीच काहुरच्या या मदतीची जाणीव असते. दोघांची परिस्थिती खूप काही खास नसते. त्यामुळे ज्या फॅक्ट्रीत ते काम करतात. तेथे अनेकदा ते चोरी करून ब्लॅक मार्केटमध्ये तो माल विकतात. त्याचे खूप जास्त पैसे त्यांना भेटत नसले तरी त्यांच्या गरजा भागवण्याइतपत पैसे मिळतात.

लॉटरीच्या बक्षीसमध्ये मिळालेली ‘कार’ या दोन मित्रांची परीक्षा घेते

एकदा मानूनची मुलगी अचानक आजारी पडते. तिच्या उपचारांसाठी काहुर आपल्या मित्राला मदत करतो. त्याने आपल्याला ऐन वेळी एवढी मोठी मदत केली म्हणून त्याला सॅलरीसोबत मिळालेले एक लॉटरीचे तिकीट ज्याचे बक्षीस असते ‘कार.’ तो ते काहुरला देतो. जर बक्षीस मिळाले तरी ती कार तुझीच असेल, असे सांगतो.

तिकिटाचे बक्षीस जाहीर होण्याच्या दोन दिवसआधी नेहमीप्रमाणे ते आपण काम करत असलेल्या फॅक्ट्रीत चोरून बाजूला केलेला माल बाहेर नेत असताना कुत्र्याच्या भूंकण्यामुळे हा प्रयत्न फसतो. दोघेही थोडक्यात बचावतात. त्यानंतर दोन दिवसांनी लॉटरीचे बक्षीस जाहीर होते आणि अनपेक्षितपणे यावेळी काहुरला ही लॉटरी लागते आणि तो बक्षीसाची कार जिंकतो.

‘कार’ Fortune कशा प्रकारे दोन मित्रांना वेगळे करते?

कार जिंकल्यानंतर खरेतर काहुरला ती कार नको असते. मात्र, मानून म्हणतो की ती कार तुझीच आहे, असे सांगतो. त्यानंतर मानून पुन्हा त्यादिवशी अर्धवट राहिलेल्या चोरीचा विषय काढतो आणि ती पुन्हा कधी करायची हे विचारतो. मात्र, काहुरला मित्राला समजावतो की आपण मागच्या वेळी थोडक्यात बचावलो. हा आपल्याला नियतीने दिलेला इशारा आहे की आपण असे चोरी करणे थांबवावे. मात्र, मानून त्याला नकार देतो. मानूनला याचा राग येतो. त्याला वाटते की आता काहूरला कार मिळाली आहे. त्यामुळे त्याला चोरीची गरज उरलेली नाही. मात्र, त्याची मुलगी आजारी असल्याने त्याला ती चोरी करावीच लागणार. मात्र काहूर नकार देतो म्हणतो. यावरून दोघांच्या मैत्रीत तडा जातो.

काहूर अनेक वेळा मानूनला समजावण्याचा प्रयत्न करतो. इतकेच काय तर त्याच्या मुलाला कितीतरी वेळा कार विकून टाकण्याचा सल्लाही देतो. मात्र, मुलगा आपली कार सोडायला आणि विकायला तयार नसतो. वेळ निघत असतो. काहुर मित्र तोडला गेल्याच्या जाणीवेने खचत जातो. त्याला मानूनचा अबोला आणि झालेली भांडणे सहन होत नाही. मानूनलाही त्रास होत असतो मात्र तो काहुरकडे दूर्लक्ष करतो आणि एक दिवस तो चोरी करताना पकडला जातो. त्याला तुरुंगवास होतो. या घटनेमुळे काहुर व्यथित होऊन मुलाला कार विकून त्याला जामीनावर सोडवून आणण्यास सांगतो. मात्र, त्याचा मुलगा ऐकत नाही. एकूणच परिस्थितीचा परिणाम होऊन काहूरला हृदयविकाराचा झटका येतो.

आपल्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी कारचा एक-एक भाग काढून त्याच्या मुलाला विकावा लागतो. मात्र, तरीही काहूर ठीक होत नाही. तर दुसरीकडे मानूनला तुरुंगात चोरीत सहभागी असणा-या काहुरचे नाव त्याने कबुल करावे यासाठी मोठ्या प्रमाणात मारझोड होते. मात्र, मानून आपल्या मित्राचे नाव सांगत नाही. अखेर काहुरच्या बेशुद्धीच्या अवस्थेत जेव्हा मानूनचे नाव घेतो. तेव्हा कारचे भाग विकून त्याचा मुलगा मानूनला सोडवून आणतो. त्यावेळी जेलर त्याला सांगतो की तुझ्या वडिलांनी आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती म्हणजे मानून सारखा खरा मित्र. आम्ही मानूनकडून तुझ्या वडिलांचे नाव वदवून घेण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्याने काही केल्या त्याचे नाव घेतले नाही. चित्रपटाचा संपूर्ण सार नेमक्या याच डायलॉगमध्ये सामावलेला आहे.

मानूनच्या रुग्णालयात पोहोचेपर्यंत काहूरने श्वास सोडलेला असतो. ज्याचे दुःख त्याच्या कुटुंबासह मानूनला देखील होते. त्याच्या अंत्यसंस्कारासाठीच्या खर्चासाठी उरलीसुरली कार विकून टाकावी लागते. या पार्श्वभूमीवर आयुष्यभर त्याची जी इच्छा असते की आपले गाणे रेडिओवर ऐकवले जावे ते त्याच्या जनाज्यावर बॅग्राउंडला प्ले होते. मात्र, ते ऐकायला आता तो जीवंत राहत नाही, ही मनाला चटका लावून जाणारी गोष्ट!

चित्रपटातील काही दृष्य बॉलीवूडच्या सौदागर चित्रपटातील दिलीपकुमार आणि राजकुमार यांच्या इमली का बुटा बेरी का पेड या गाण्यातील दृश्याची आठवण करून देतात. दोघांच्या मैत्रीची परीक्षा घेणारी Fortune ‘कार’ आपल्याला पुन्हा एकदा खरा मित्र हीच संपत्ती याची जाणीव करून दिल्याशिवाय राहत नाही.

 

हे ही वाचा :

मनोरंजन : जगाची दुनियादारी

मनोरंजन : डिज्नीच्या ‘प्लस-साईज’ नायिकेची चर्चा

Back to top button