Sambhaji Chhatrapati: कोश्यारींवर कारवाई का नाही? संभाजीराजे आक्रमक; 'कोश्यारी हटाओ'चा नारा

पुढारी ऑनलाईन: छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या विधानानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी काही दिवसांपासून चर्चेत आहेत. शनिवारी देखील असा काहीसा प्रकार घडल्याने त्यांच्यावर पुन्हा टीका होत आहे. २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना कोश्यारी यांनी चप्पल घालूनच श्रद्धांजली वाहिली. हा प्रकार समोर आल्याने ते पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.
कोश्यारी यांची वक्तव्ये आणि त्यांची कृती ही महाराष्ट्राविरोधी आहे. तरी देखील सरकारकडून कोणतीही कारवाई केली जात नाही असा आरोप करत संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवरून ‘#कोश्यारी_हटाओ’चा नारा दिला आहे. त्यांच्या या ट्विटने पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारींचा मुद्दा चर्चेत आला आहे.
भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का ? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच !#कोश्यारी_हटाओ
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 27, 2022
संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अजूनही भगतसिंग कोश्यारी यांच्यावर कारवाई होत नाही हे राज्यकर्त्यांचे अपयश आहे. आम्ही याचा अर्थ असा समजायचा का, की राज्यकर्ते देखील राज्यपालांच्या विधानांशी सहमत आहेत. महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला कोणीही गृहित धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच! असे म्हणत त्यांनी राज्यकर्त्यांना धमकी वजा समज दिल्याची चर्चा आहे.
हेही वाचा:
- Udayanraje Bhosale : वादग्रस्त विधाने ही विकृतीच : खा. उदयनराजे भोसले
- सातारा : पद झेपत नसेल तर कोश्यारींना बाजूला केलं पाहिजे : खा. उदयनराजे
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निषेधार्थ लातूरमध्ये कडकडीत बंद
- कोश्यारींना राज्यपालपदावरून हटविण्याच्या हालचाली