'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' मालिकेतील कलाकारांनी घेतले एकवीरा आईचे दर्शन | पुढारी

'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' मालिकेतील कलाकारांनी घेतले एकवीरा आईचे दर्शन

पुढारी ऑनलाईन : समकालीन मालिकांसोबत ‘ज्ञानेश्वर माऊली’, ‘गाथा नवनाथांची’ अशा भक्तिपर मालिकांच्या यशानंतर आता लोकप्रिय एकवीरा आईचा महिमा दाखवणारी ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहे. आगारी कोळी समाजासह अन्य लोकांचेही हे कुलदैवत आहे. पौराणिक कथेनुसार कार्ला येथील मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले असून एकवीरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे.’आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ मालिकेतील कलाकारांनी कार्ला (लोणावळा) येथे एकवीरा आईचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

आयोजित पत्रकार परिषदेत एकवीरा आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मयूरी वाघ, अभिनेत्री अमृता पवार, मालिकेचे निर्माते दिग्पाल लांजेकर, लेखक आणि निर्माते चिन्मय मांडलेकर, बिझनेस हेड अजय भाळवणकर, सोहा कुळकर्णी आदी उपस्थित होते. ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ या मालिकेत वेगळी व्यक्तिरेखा साकारलेली अभिनेत्री अमृता पवार ही प्रमुख भूमिकेत असणार आहे. तर अभिनेत्री मयूरी वाघ ही यामध्ये एकवीरा आईच्या भूमिकेत दिसणार आहे.

आतापर्यंत आपण मयूरीला अनेक आव्हानात्मक भूमिका साकारताना पाहिले आहे. मात्र, या मालिकेत ती आई एकवीराची भूमिका कशा प्रकारे निभावते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्या व्यतिरिक्त या मालिकेत निषाद भोईर, अभिनय सावंत, सविता मालपेकर, मिलिंद सफई, धनंजय वाबळे यांच्या प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ येत्या २८ नोव्हेंबरपासून चाहत्याच्या भेटीस येत आहे.

या मालिकेचे दोन वेगवेगळे उत्कंठावर्धक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आले असून त्यातील आशयावरून असे लक्षात येते की, कलियुगातल्या दानवांचा नाश करण्यासाठी आणि संकटातून आपल्या भक्तांना तारण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी एकवीरा आई येत आहे. ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ या मालिकेचे दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलेले शीर्षक गीत अतिशय सुंदर आहे. हे गीत केवल वाळंज आणि जुईली जोगळेकर यांनी गायले असून देवदत्त बाजी यांनी संगीतबद्ध केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button