रितेश देशमुखच्या टिझरनं अक्षय कुमारला केलं 'वेड' | पुढारी

रितेश देशमुखच्या टिझरनं अक्षय कुमारला केलं 'वेड'

पुढारी ऑनलाईन : अभिनेता रितेश देशमुख याने आपला मित्र अक्षय कुमार याला आगामी ‘वेड’ चित्रपटाचा टिझर पाहण्यासाठी पाठवला आणि तो त्याला इतका आवडला की, त्यांनी आपल्या सोशल मीडियावर लगेच शेअर केला आहे. यामुळे ‘वेड’ चित्रपटाच्या टिझरने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला देखील वेडं केले आहे.

२० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या -वेगळ्या भूमिकेतून चाहत्याच्या भेटीला येत आहे. ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘वेड’ या आगामी चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे, या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुख यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जेनेलिया देशमुख ही मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत. यापूर्वी जेनेलियाने हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, अभिनेता शुभंकर तावडे व अभिनेत्री जिया शंकर या कलाकारांनी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. आघाडीचे संगीतकार अजय अतुल यांनी ‘वेड’ चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. तर अजय – अतुल, गुरु ठाकूर यांनी चित्रपटातील गाणी लिहिली आहेत. या चित्रपटाची पटकथा रुषिकेश तुराई, संदीप पाटील, रितेश देशमुख यांनी लिहिली आहे.

तसेच संवाद प्राजक्त देशमुख यांनी लिहिले आहेत. सिनेमॅटोग्राफी भूषणकुमार जैन यांनी तर संकलनाची जबाबदारी चंदन अरोरा यांनी पार पाडली आहे. संदीप पाटील हे कार्यकारी निर्माते असून जेनेलिया देशमुखने वेड चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘वेड’ या चित्रपटाचा टिझर मुंबई फिल्म कंपनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button