आता आपल्याला एकत्र यावेच लागेल; उद्धव ठाकरे यांची साद | पुढारी

आता आपल्याला एकत्र यावेच लागेल; उद्धव ठाकरे यांची साद

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : देशातील लोकशाही टिकविण्यासाठी आपल्याला एकत्र यावेच लागेल. केवळ लोकांना जागे करून उपयोग नाही. आपण एकत्र येऊन हे काम करणार नसू तर दोघांना आपल्या आजोबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, अशा स्पष्ट शब्दांत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना युतीसाठी साद घातली.

प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी दोनवेळा युतीसाठी साद घातली असताना रविवारी प्रथमच ठाकरे यांनी त्याला जाहीरपणे प्रतिसाद दिला. प्रबोधनकार ठाकरे यांचा जीवनपट आणि साहित्याचा समावेश असणार्‍या प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाचा लोकार्पण सोहळ्यानिमित्त उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे प्रथमच व्यासपीठावर एकत्र आले होते. शिवाजी नाट्य मंदिरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, संकेतस्थळाचे संपादक सचिन परब यांच्यासह शिवसेना नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

मत मागण्यासारखे स्वतःकडे काही नसल्याने वेगवेगळे मुखवटे चढवून भाजप मते मागत आहे. एकीकडे देशात गोमांस सापडले म्हणून लोकांना मारले जाते, दुसरीकडे महिलेवर अत्याचार करून तिच्या डोळ्यासमोर घरच्यांची हत्या करणार्‍यांची शिक्षा माफ केली जाते, त्यांना उमेदवारी दिली जाते, हे आमचे हिंदुत्व नाही. आता एकत्र येण्याची वेळ आली आहे. पुढे कोण येणार म्हणत थांबून चालणार नाही. त्या काळात प्रबोधनकार आणि बाबासाहेबांनी मारलीच ना उडी, अशी सादही ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांना घातली.

तत्पूर्वी, प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आपण मनुच्या कायद्यात अडकून पडणार आहोत की नव्याने काही उभारणार आहोत हा प्रश्न आहे. धर्मातील कोणते तत्वज्ञान घेऊन पुढे जायचे, हे ठरवायचा हा काळ आहे.

Back to top button