मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना दाखविणार काळे झेंडे

औरंगाबाद , पुढारी वृत्तसेवा : १७ सप्टेंबर रोजी औरंगाबाद दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखविणार आहेत.

मराठा आरक्षणासह इतर प्रलंबित मागण्यासंदर्भात अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे मराठा समाजात आक्रोशाची भावना निर्माण झाली असून येत्या १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मराठा क्रांती ठोक मोर्चा व छत्रपती संभाजीराजे यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी १ महिन्यांचा अवधी दिला होता. आता तीन महिने उलटूनही राज्यसरकारने मागण्यांसर्भात अद्यापही कोणताही ठोस निर्णय घेतला नाही.

त्यामुळे येत्या १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री ठाकरे औरंगाबाद शहरात आल्यावर त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिली. यावेळी राज्य समन्वयक अप्पासाहेब कुढेकर, राहुल पाटील, पंढरीनाथ गोडेसे पाटील, मनोज मुरदारे, भरत कदम, निवृत्ती मांडकीकर, किरण काळे पाटील, धनंजय चिरेकर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

हेही वाचा: 

Back to top button