अफजलखान कबरीच्या वादाचा धगधगता इतिहास | पुढारी

अफजलखान कबरीच्या वादाचा धगधगता इतिहास

प्रतापगड; अभय हवालदार / प्रेषित गांधी : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ले प्रतापगड सर्वांसाठी ऊर्जास्थान बनला आहे. अफजलखान कबरीचा धगधगता इतिहास गुरुवारी झालेल्या धडक कारवाईने पुन्हा सर्वांसमोर आला आहे. अफजलखानाबरोबरच त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा याचीही कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधण्यात आली. सहा फुटांच्या या कबरीवर 1956 पर्यंत कौलारू छप्पर असल्याचा उल्लेख आहे. 1980 ते 1985 दरम्यान याठिकाणी अतिक्रमण सुरू झाले. याठिकाणी गेल्या 37 वर्षांपासून अतिक्रमण सुरू आहे. सुरुवातीला उरुस भरवून अफजलखानाचे उदात्तीकरण करण्यात आले. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या दर्ग्याचे दर्शन घेण्याची सक्ती काही फकीर करत असल्याच्या तक्रारीही अनेकदा झाल्या आहेत. 2006 च्या हिंसक आंदोलनानंतर ही कबर सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली; पण शिवभक्तांची जी मागणी होती, त्याकडे कायम दुर्लक्ष होत आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने गुरुवारी कबरीलगतचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश काढले आणि प्रत्यक्षात ही मोहीम यशस्वीही झाली.

अफजलखानाच्या कबरीभोवती अतिक्रमण करून केलेले बांधकाम.
अफजलखानाच्या कबरीभोवती अतिक्रमण करून केलेले बांधकाम.

अफजलखानाच्या कबरीच्या विषयावरून पाचवड (ता. वाई) येथे 2006 साली दंगल झाली होती. हिंदुत्ववादी संघटनांना प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्याची परवानगी नाकारून त्याऐवजी पाचवड येथे साजरा करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, त्यानंतर प्रक्षोभक भाषणे होऊन जमाव प्रक्षुब्ध झाला. सुमारे दोन तास दगडफेक झाली. अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना तत्कालीन जिल्हाधिकारी सुबराव पाटील व जिल्हा पोलिसप्रमुख चंद्रकांत कुंभार यांनी कणखरपणे परिस्थिती हाताळून त्यावर नियंत्रण मिळवले. गुरुवारच्या धडक कारवाईने त्या स्मृतींना जिल्हावासीयांनी उजाळा दिला.

सप्टेंबर 2006 मध्ये शिवप्रताप दिन प्रतापगड येथे साजरा करण्यावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. तणावाची परिस्थिती पाहून तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी तशी परवानगी नाकारली. अखेर पाचवड येथे शिवप्रताप दिन साजरा करण्याची परवानगी दिली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सातारा पोलिसांनी नियोजन केले. पाचवड येथे दुपारी दोनच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात झाली. काही वक्त्यांनी प्रक्षोभक भाषणे केली. त्यामुळे आपण प्रतापगडावर गेेले पाहिजे, अशा एका सुरात मागणी झाल्यानंतर जमाव सैरभैर झाला. पोलिसांच्या वाहनांसह महामार्गावरील वाहनांना लक्ष्य करून दगडफेक करण्यास सुरुवात झाली. यामुळे गोंधळ उडाला. पोलिसांनी लाठीहल्ला केला. पोलिस व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये धूमशान उडाले.

अतिक्रमण पाडल्यानंतर
अतिक्रमण पाडल्यानंतर

याबाबतची खबर मिळताच जिल्हाधिकारी सुबराव पाटील यांनी तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याच्या द़ृष्टीने कठोर पावले उचलली. तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख चंद्रकांत कुंभार यांनीही हे प्रकरण कणखरपणे हाताळले. या दोघांच्या टीमवर्कने बिघडलेली परिस्थिती पूर्वपदावर आली. गुरुवारी झालेल्या धडक कारवाईनंतर सुबराव पाटील व चंद्रकांत कुंभार यांची जिल्हावासीयांना आठवण झाली.

कबरीसाठी मुंबईहून येत होता मोगर्‍याचा हार

छत्रपती शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 याच दिवशी अफजलखानाचा वध केला आणि कधीही न पुसला जाणारा इतिहास घडवला. हाच दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. अफजलखानाचं उदात्तीकरण केले जात असल्याचा आरोप अनेक वर्षांपासून केला जातो. 1990ला झालेलं हे बांधकाम यापूर्वीच वादात आले; पण 2006 ला मोठा वाद झाला आणि कबरीजवळ सर्वांनाच प्रवेश बंद करण्यात आला. कबरीसाठी मुंबईहून मोगर्‍याचा हार येत होता, असेही सांगितले जाते.

ते बांधकाम केले होते सील

2001 मध्ये कबरीचा वाद विधिमंडळामध्येही उपस्थित केला आणि सातारा जिल्हा प्रशासनाला अफजलखानाचा दर्गा सील करण्यास भाग पडले. 19 निवासी खोल्या, दोन हॉल असे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. हे सर्व बांधकाम तत्कालीन प्रांताधिकारी प्रदीप पाटील, पोलिस उपअधीक्षक जगदेवराव जाधव व तत्कालीन आमदार नितीन शिंदे यांच्या उपस्थितीत सील करण्यात आले होते.

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची छायाचित्रे ब्रिटिशांनीही केली जतन

10 नोव्हेंबर हा शिवप्रताप दिन. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच दिवशी अफजलखानाचा वध केला आणि त्याच्या प्रचंड सैन्याला धूळ चारली होती. प्रतापगडावरच्या अफजलखानाच्या कबरीची अतिशय जुनी ब्रिटिशांनी काढलेली चित्रे व आतापर्यंतची छायाचित्रे, शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देत आहेत. छत्रपतींचा हा पराक्रम ब्रिटिशांनीही कॅमेर्‍यात साठवून ठेवला. प्रतापगडाबरोबरच प्रत्येक किल्ल्यावरची अतिक्रमणे निघाली पाहिजेत. मुळात अशी अतिक्रमणे होऊ नयेत, अशी शिवप्रेमींची मागणी आहे. अफजलखानाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय साहसाची निशाणी आहे.

26 वर्षे 144 कलम लागू

काही स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन करून अफजलखान कबरीचे उदात्तीकरण थांबवावे, अशी मागणी केली होती. अफजलखानाची कबर सुरुवातीला काही फूट जागेत होती. त्याठिकाणी वन विभागाच्या हद्दीत एकरभर जागेत नंतर अतिक्रमणे झाली. कबर परिसराचे उदात्तीकरणही होऊ लागले होते. हे अतिक्रमण काढावे, या मागणीसाठी 2006 मध्ये तीव्र आंदोलन केले गेले. त्यावेळेपासून अफजलखान कबरीकडे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या ठिकाणी गेली 26 वर्षे 144 कलम लागू आहे. या कबरीजवळ नेहमी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

अफजलखान वधाचा पुतळा उभारा

कबरीजवळ झालेले अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी 2017 मध्ये कोर्टाकडून आदेश आले होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकारकडून कबरीजवळचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी विरोध केला गेला. अनधिकृत बांधकाम काढले तर तणाव वाढेल, अशी भूमिका सरकारने घेतल्याचा आरोपही झाला. दहशतवादविरोधी लढण्याची प्रेरणा देणारी अफजलखान वधाची जागा महाराष्ट्रातील शिवभक्तांना खुली करण्याची मागणी करण्यात आली. अफजलखानाचा वध केलेला पुतळा उभारावा, त्याला शिवप्रताप भूमी असे नामकरण करण्याची मागणी करण्यात आली.

कायदा आणि सुव्यवस्थेसाठी कबरीला कुलूप

सुरुवातीला छोटीशी वास्तू असलेल्या कबरीच्या शेजारी हळूहळू बेकायदा बांधकामे करण्यात आली. ती वादाच्या भोवर्‍यात अडकल्याने अफजलखान कबरीच्या विषयावरून अनेकदा तणातणी झाली. त्यामुळे सातारा पोलिस अधीक्षकांच्या अहवालानुसार कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव सरकारने ही वास्तू कुलूपबंद ठेवली. तेथे सामान्यांना प्रवेशबंदी केली. ते कुलूप काढण्यासाठी न्यायालयीन प्रयत्न झाले. मात्र, गृह खात्याने या कबरीच्या वास्तूचे कुलूप उघडण्यास प्रतिबंध केला.

दर्गा हजरत सय्यद मोहम्मद अफजलखानचे प्रवेशद्वार.
दर्गा हजरत सय्यद मोहम्मद अफजलखानचे प्रवेशद्वार.

दोन कबरींचे उल्लेख नाहीत इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांची माहिती

इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार
इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : प्रतापगडाच्या पायथ्याशी असणार्‍या अफजलखानाच्या कबरीभोवतीचे अनधिकृत बांधकाम पाडल्यानंतर खानाच्या कबरीसह एकूण तीन कबरी खुल्या झाल्या आहेत. यामुळे खान सोडून इतर दोन कबरी कोणाच्या? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तविक प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाची एकमेव कबर असल्याचे उल्लेख विविध पुस्तकांत आहेत. त्याबद्दलची छायाचित्रे व स्केच उपलब्ध आहेत. मात्र, इतर दोन कबरींबद्दल कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. यामुळे पुरातत्त्वीय अभ्यास पद्धतीतील कार्बन डेटिंगसारख्या पद्धतीचा अवलंब केल्यास कबरींच्या बांधकामाचा कालावधी समजू शकेल, असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केले.

रयतेच्या स्वराज्यावर चालून आलेल्या आदिलशाही सरदार अफजलखानाला 10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी ठार केले. यानंतर दुसर्‍या दिवशी रामायणातील ‘मरणान्ता नि वैराणी’ या उक्तीप्रमाणे अफजलखानाच्या मृतदेहाचा दफन विधी त्याच्या इतमामास साजेल अशा प्रकारे केला. यानंतर त्याचे शिर राजगडावर नेऊन बालेकिल्ल्याच्या दरवाजात दफन केले. एवढ्यावर न थांबता खानाच्या प्रतापगड परिसरातील कबरीला दिवाबत्तीसाठी वार्षिक उत्पन्नाची व्यवस्था करून दिल्याचे उल्लेख ‘प्रतापगडचे युद्ध’ या कॅप्टन ग. वा. मोडक लिखित पुस्तकात (1927) असल्याची माहिती डॉ. पवार यांनी दिली.

अफजलखानाच्या कबरीला कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. कारण, ही कबर म्हणजे शिवछत्रपतींचा पराक्रम, उच्चकोटीचा मानवतावाद आणि धर्मनिरपेक्षतेची साक्षीदार आहे. किंबहुना ती शिवछत्रपतींच्या जीवन कार्यातील उद्दात्त अशी कृती आहे. शिवछत्रपती परधर्म सहिष्णू होते. मात्र, त्याचा गैरफायदा घेऊन अनधिकृत गोष्टी करणे चुुकीचे आहे. खानाच्या ऐतिहासिक कबरीभोवती अनैतिहासिक-अनधिकृत बांधकाम करणे चुकीचेच होते. खानाचे उदात्तीकरण करून त्याच्या कबरीभोवती झालेले अनधिकृत बांधकाम राज्य शासनाने पाडून योग्य ती कृतीच केली आहे.

उदात्तीकरणविरोधात एकवीस वर्षांचा लढा

आमदार नितीन शिंदे
आमदार नितीन शिंदे

सांगली; पुढारी वृत्तसेवा : प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीचे उदात्तीकरण आणि बेकायदा बांधकाम याविरोधात शिवसेनेचे तत्कालीन आमदार नितीन शिंदे यांनी विधिमंडळाच्या 2001 च्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला होता. एकवीस वर्षे सतत लढा सुरू होता. सन 2006 मध्ये तर पोलिस आणि शिवभक्तांमध्ये जोरदार धुमश्चक्रीही उडाली होती. अखेर प्रशासनाने अफजलखानाच्या कबरीभोवतालचे बांधकाम पाडून वादग्रस्त विषय संपवला.

प्रतापगड, वाई परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे विधानपरिषदेतील तत्कालीन आमदार नितीन शिंदे (सांगली) यांना सन 2001 साली पत्र पाठवले होते. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीचे उदात्तीकरण सुरूअसल्याकडे पत्रातून लक्ष वेधले होते. विधानपरिषद सभापतींच्या आदेशानुसार जानेवारी 2001 मध्ये प्रांताधिकारी प्रदीप पाटील, डीवायएसपी जागदेव जाधव व तत्कालीन आमदार नितीन शिंदे आणि शिवभक्तांनी कबर परिसराची पाहणी केली. तेव्हा अफजलखान कबरीभोवती बांधकाम केल्याचे निदर्शनास आले. तेथे मार्बलच्या फरशा, चांदी, चंदनाचे दरवाजे, झुंबर, हंड्या दिसून आले. दोन मोठे हॉल आणि 19 आलिशान निवासी खोल्या होत्या.

Back to top button