कोल्हापूर : गुंड कुमार गायकवाड खून प्रकरणातील एका संशयिताला अटक | पुढारी

कोल्हापूर : गुंड कुमार गायकवाड खून प्रकरणातील एका संशयिताला अटक

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरातील टाकळाखणीनजीक गुंड कुमार गायकवाड याचा रविवारी रात्री झालेल्या खून प्रकरणी रवी कांबळे (रा. कनान नगर, कोल्हापूर) या संशयिताला पोलिसांनी अटक केली. राजारामपुरी पोलीस ठाण्यात आज सकाळी या गुन्ह्याची नोंद झाली होती.

राजेंद्रनगरातील गँगवॉरचा रविवारी भडका उडाला. जमीन व्यवहाराच्या वादातून कुमार गायकवाड (वर २४) या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा पाठलाग करून भररस्त्यात निर्घृण खून करण्यात आला होता. टाकळाखणी नजीक हल्लेखोरांनी तलवारी, एडक्याच्या साहाय्याने त्याच्यावर 17 वार केले होते. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

कुमार गायकवाड हा त्याचा मामा त्र्यंबक गवळी यांच्याकडे आईसह राहत होता. रविवारी रात्री त्र्यंबक गवळी हे जमिनीच्या व्यवहारानिमित्त ताराराणी चौकात आले होते. यावेळी कुमारही त्यांच्या बरोबर होता. मात्र, दोघे वेगवेगळ्या दुचाकींवरून आले होते. याचवेळी कुमारच्या मागावर असलेल्या हल्लेखोरांनी कावळा नाका अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोरून त्याचा पाठलाग सुरू केला. त्यांना पाहून कुमार टेंबलाई उड्डाणपुलापलीकडे गेला. मात्र, टाकाळा येथील खणीजवळ त्याला हल्लेखोरांनी गाठले. या ठिकाणी त्याच्यावर सपासप वार केले. हल्ल्यात एका तलवारीची मूठ तुटून या ठिकाणी पडली होती. राजारामपुरी पोलीस ठाण्यात आज सकाळी या गुन्ह्याची नोंद झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी रवी कांबळे या संशयिताला अटक केली आहे. मुख्य संशयित अमर माने याच्यासह चार ते पाच जणांचा शोध पोलीस घेत आहेत.

कुमारच्या नावावर अनेक गंभीर गुन्हे

मृत कुमार गायकवाड याच्यावरही मारामारी, खुनाचा प्रयत्न, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. बिंदू चौक सबजेलमधून बाहेर पडतानाचा त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्याने ‘किंग ऑफ कोल्हापूर’ अशा नावाचे एक इन्स्टाग्राम अकाऊंट काढले होते.

हेही वाचा :

Back to top button