‘ईडी’ग्रस्त नेत्यांचा मुख्यमंत्री शिंदेंकडे तगादा; ईडीकडून क्लोजर रिपोर्ट मिळवण्याची मागणी | पुढारी

‘ईडी’ग्रस्त नेत्यांचा मुख्यमंत्री शिंदेंकडे तगादा; ईडीकडून क्लोजर रिपोर्ट मिळवण्याची मागणी

मुंबई: नरेश कदम : भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आमची अजूनही ईडीकडून चौकशी सुरू असून या प्रकरणात ईडीकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट देण्यात यावा, असा तगादा शिंदे गटात गेलेल्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लावला आहे. शिंदे सरकार सत्तारुढ होऊन चार महिने उलटले तरी ईडीचा फेरा सुरू असल्याने शिंदे गटात आलेले नेते अस्वस्थ आहेत.

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी सरकार बनविल्यानंतर शिवसेनेच्या आमदार आणि खासदार यांची भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ईडी चौकशी सुरू झाली होती. खासदार भावना गवळी, माजी खासदार आनंद अडसूळ, आमदार प्रताप सरनाईक, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह शिवसेनेचे नेते ईडीच्या चौकशीच्या फेर्‍यात अडकले आहेत. अनेक नेत्यांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे. त्यात गेल्या आठवड्यात आमदार प्रताप सरनाईक यांची मालमत्ता ईडीने जप्त केली, त्यामुळे शिंदे गटातील या नेत्यांच्या पायाखालील वाळू सरकू लागली आहे. भावना गवळी, यशवंत जाधव यांच्यासह ईडीच्या फेर्‍यात अडकलेल्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ईडीच्या चौकशीतून आम्हाला दिलासा मिळेल, असे आश्वासन आपल्या गटात सामील होताना मिळाले होते; पण चार महिने उलटले तरी ईडीने चौकशी सुरूच ठेवली आहे. आमच्या प्रकरणात ईडीकडून न्यायालयात क्लोझर रिपोर्ट सादर करावा, अशी विनंती या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. आम्हाला पुन्हा निवडणुकीला उभे राहायचे आहे, त्यामुळे क्लीन चिट मिळावी, असे या नेत्यांचे म्हणणे आहे. आपण लवकर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या नेत्यांना दिले.

Back to top button