Rape Case : भारतीय महिला बलात्कार झाल्याचा खोटा आरोप करणार नाही - मणिपूर उच्च न्यायालय | पुढारी

Rape Case : भारतीय महिला बलात्कार झाल्याचा खोटा आरोप करणार नाही - मणिपूर उच्च न्यायालय

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rape Case : भारतीय महिला ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी बलात्काराचा खोटा आरोप करणार नाहीत, असे निरीक्षण मणिपूर उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. चार आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना न्यायमूर्ती एम. व्ही. मुरलीधरन यांनी हे मत नोंदवले आहे.

ते म्हणाले, “बलात्कार पीडित महिलेला आयुष्यभर वेदनेला तोंड द्यावे लागते, त्यामुळे भारतीय महिला बलात्काराचा खोटा आरोप लावणार नाहीत.”

Rape Case : या घटनेतील 3 आरोपी आहेत. यातील एक जण नर्सिंग कॉलेजचा संस्थाचालक आहे तर दोघे या संस्थेतील शिक्षक आहेत.
पीडितेच्या मते दोघा शिक्षकांनी तिला पिकनिकला जाण्यासाठी घरातून घेतले. पिकनिकसाठी शाळेतील इतर शिक्षक आणि विद्यार्थीही आले होते. पिकनिकवरून परत येताना या दोघा शिक्षकांनी आणि संस्थाचालकाने पीडितेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला.
या प्रकरणात संस्थाचालक हा मुख्य आरोपी आहे. आरोप दाखल झाल्यानंतर संस्थाचालक आणि दोघे शिक्षक फरारी आहेत. या तिघांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. संस्थाचालकाच्या मते ही मुलगी आणि त्याच्यात प्रेमसंबंध आहेत. पिकनिकच्या दिवशीच दोघांनी सहमतीने लग्न केले. लग्नानंतर मणिपूरमधील प्रथेनुसार या मुलीला तिच्या घरी सोडले. पण घरी सोडताना तिच्या बहिणीने गोंधळ घातला आणि तिला मारहाण करून बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यास भाग पाडले.

Rape Case : न्यायमूर्ती म्हणाले, “जे पुरावे सादर केले आहेत ते पाहता प्रमुख आरोपीने अपहरणाचा कट रचला आणि सहकाऱ्यांसह तिच्यावर बलात्कार केला हे दिसून येते. प्रथमदर्शनी प्रमुख आरोपीने आपल्या विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याचे दिसून येते. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला ही घटना कलंक आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जर आरोपी फरार असेल किंवा सातत्याने गुन्हे करत असेल तर त्याला अटकपूर्व जामीन देता येत नाही.”

Rape Case : आपला समाज हा पारंपरिक आहे, अशा स्थितीत एखादी महिला बलात्कार झाल्याचा खोटा आरोप करून आयुष्यभरासाठी कलंक लावून घेण्याची शक्यता नाही, असेही न्यायमूर्तींनी म्हटले आहे.

Back to top button