Nashik Diwali : घरोघरी लक्ष्मीपूूजन उत्साहात | पुढारी

Nashik Diwali : घरोघरी लक्ष्मीपूूजन उत्साहात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आनंदपर्व दिवाळीतील महत्त्वाचा दिवस लक्ष्मीपूजन सोमवारी (दि. 24) मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. घरोघरी (Nashik Diwali) श्री लक्ष्मीचे पूजन करून कुटुंबावर अखंड कृपेची मनोकामना केली. नाशिककरांनी पूजनानंतर सहकुटुंब फटाके फोेडण्याचा व फराळाचा आनंद लुटला. तत्पूर्वी, नरकचतुर्दशीनिमित्त पहाटे घरोघरी अभ्यंगस्नान पार पडले. तसेच दर्शनासाठी भाविकांनी मंदिरांमध्ये गर्दी केली.

कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा दिवाळीच्या सणाला आनंदात प्रारंभ झाला आहे. सोमवारी पहाटे नागरिकांनी नरकचतुर्दशी साजरी केली. दिवाळीमधील महत्त्वपूर्ण दिवस म्हणजे अश्विन कृष्ण अमावास्या अर्थात, लक्ष्मीपूजन. सायंकाळनंतर घरोघरी सहकुटुंब श्री लक्ष्मीचे पूजन करण्यात आले. चोपडी पूजनालाही विशेष महत्त्व असल्याने नाशिककरांनी नवीन वहीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर नागरिकांनी फटाके फोडण्याचा मनमुराद आनंद सहकुटुंब लुटला. तसेच आप्तस्वकीयांसोबत फराळाचाही आस्वाद घेतला. भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्याचे स्मरण म्हणजे नरकचतुर्दशी होय. या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने नरकयातना कमी होतात, अशी भावना आहे. त्यामुळे घराघरांमध्ये पहाटेच अभ्यंगस्नान पार पडले. त्यानंतर पंचवटीमधील श्री काळाराम मंदिर, ग्रामदैवत श्री कालिकामाता, नवश्या गणपती, सांडव्यावरील देवी यासह अन्य देव-देवतांच्या मंदिरांमध्ये नाशिककर लीन झाले. भाविकांच्या मांदियाळीमुळे मंदिर परिसरांना जत्रेचे स्वरूप आले होते. दरम्यान, दिवाळीमध्ये बुधवारी (दि. 26) भावा-बहिणींच्या नात्याची वीण घट्ट करणारे भाऊबीज तसेच पाडवा साजरा करण्यात येणार आहे.

नाशिककरांवर शुभेच्छांचा वर्षाव

लक्ष्मीपूजन आणि नरकचतुर्दशीनिमित्त नाशिककरांनी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी नागरिकांनी आप्तस्वकीयांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या. तसेच व्हॉटस्अ‍ॅपसह फेसबुक, ट्विटर व अन्य सोशल माध्यमांतून नेटिझन्सने शुभेच्छा दिल्या. नरकचतुर्दशी असल्यामुळे सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी नेटकर्‍यांची चढाओढ लागली होती.

हेही वाचा :

Back to top button