Allahabad HC : पीडितेशी लग्‍न करण्‍याच्‍या अटीवर बलात्‍कार प्रकरणातील आरोपीला जामीन | पुढारी

Allahabad HC : पीडितेशी लग्‍न करण्‍याच्‍या अटीवर बलात्‍कार प्रकरणातील आरोपीला जामीन

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला तिच्‍याशी लग्‍न करण्‍याच्‍या अटीवर अलाहाबाद
उच्‍च न्‍यायालयाने ( Allahabad HC ) जामीन मंजूर केला. मुलगी अल्‍पवयीन असताना तिच्‍यावर बलात्‍कार झाला होता. आता मुलगी सज्ञान झाली असून, आरोपीला तिच्‍याशी लग्‍न करण्‍याच्‍या अटीवर जामीन मिळणार असले तर आमची हरकत नाही, असे पीडितेच्‍या वडिलांनी न्‍यायालयास सांगितले. आरोपीने पीडित मुलीशी १५ दिवसांमध्‍ये लग्‍न करावे, तसेच तिच्‍या मुलालाही स्‍वीकारावे, अशी अट ठेवत आराेपीला उच्‍च न्‍यायालयाने जामीन मंजूर केला.

उत्तर प्रदेशातील खेरी जिल्ह्यातील आरोपीवर अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कारप्रकरणी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण ( पोक्सो ) कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. त्‍याला अटक करण्‍यात आली. अल्‍पवयीन पीडितेची यावर्षी एप्रिल महिन्‍यात प्रसूती झाली. तिला मुलगा झाला आहे.

आराेपीच्‍या जामीन अर्जावर अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयात १० ऑक्‍टोबर रोजी न्‍यायमूर्ती दिनेश कुमार सिंह यांच्‍यासमोर सुनावणी झाली. युक्‍तीवादावेळी आरोपीचे वकील म्‍हणाले,  तरुणाचे मुलीवर प्रेम होते. दोघेही लग्‍न करण्‍यासाठी घरातून पळून गेले होते. मात्र तरुणाला अटक झाली. मुलीशी प्रेम करत असल्‍याने आता तो तिच्‍याशी लग्‍न करण्‍यास तयार आहे. अल्‍पवयीन पीडितेची एप्रिल महिन्‍यात प्रसूती झाली आहे. तसेच पीडिता आणि तिच्‍या वडिलांनीही तरुणाला जामीन मंजूर करण्‍याबाबत हरकत घेतलेली नाही. हेबाब लक्षात घेत आरोपीला जामीन मंजूर करण्‍यात येत असल्‍याचे न्‍यायाधीशांनी स्‍पष्‍ट केले.

Allahabad HC : १५ दिवसांमध्‍ये लग्‍न करण्‍याचे आदेश

या वेळी न्‍यायमूर्ती दिनेश कुमार सिंह म्‍हणाले, “अल्पवयीन पीडितेची प्रसूती झाली आहे. पीडितेने आणि तिच्या वडिलांनीही या खटल्याच्या गुणवत्तेवर कोणतेही मत व्यक्त न करता आरोपीला जामीन मंजूर करण्‍यास विराेध दर्शवलेला नाही. हे लक्षात घेऊन या प्रकरणातील आराेपीला जामीन मंजूर केला जात आहे. जामीन मंजूर झाल्‍यानंतर आरोपीने १५ दिवसांच्या आत तरुणीशी लग्न करावे. तसेच एका महिन्यात या विवाहाची नोंदणी करावी, असा आदेशही न्‍यायमूर्ती दिनेश कुमार सिंह यांनी दिला.

हेही वाचा : 

Back to top button