Child obesity: महिलेने गरोदरपणात प्रक्रियायुक्त अन्न खाल्ल्यास अपत्य लठ्ठ होण्याचा धोका; संशोधनातून निष्कर्ष | पुढारी

Child obesity: महिलेने गरोदरपणात प्रक्रियायुक्त अन्न खाल्ल्यास अपत्य लठ्ठ होण्याचा धोका; संशोधनातून निष्कर्ष

पुढारी ऑनलाईन: महिलेने गरोदरणपणात पॅकेजिंग केलेले प्रक्रियायुक्त चिप्स, स्नॅक्स, चॉकलेट्स, मिठाई असे पदार्थ किंवा अन्न खाल्ल्यास लठ्ठ अपत्य होण्याचा धोका (Child obesity) निर्माण होतो, असे संशोधनातून समोर आले आहे. बाळाच्या जन्मानंतरही आईच्या वजनातही वाढ होण्याची अधिक शक्यता असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेच्या बीएमजे जर्नलमध्ये यासंदर्भात नुकतेच संशोधन प्रकाशित केले आहे.

संशोधकांनी 14 हजार 553 महिलांनी जन्म दिलेल्या 19,958 बालकांची तपासणी केली. यापैकी 45 टक्के मुले होती आणि सर्व 7 ते 17 वर्षे वयोगटातील होते. यामध्ये काही महिलांच्या आणि त्यांनी जन्म दिलेल्या मुलांच्या वजनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. तर दुसर्‍या एका अभ्यासात 2 हजार 790 आई आणि 2,925 मुलांची तपासणी करण्यात आली. गर्भधारणेपूर्वीच्या आहाराचा मुलांच्या लठ्ठपणाशी (Child obesity) काहीही संबंध नसल्याचे समोर आले.

संशोधकांनी गर्भधारणेदरम्यान महिलांच्या आहाराव्यतिरिक्त अन्य अनेक घटकांचा अभ्यास केला. यामध्ये शारीरिक हालचाली, धूम्रपान, मुलांचा आहार आणि त्यांची बैठी जीवनशैली यांचा समावेश होता.

जगभरात 39 दशलक्ष मुले लठ्ठ

2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जगातील 39 दशलक्ष मुले एकतर लठ्ठ (Child obesity) आहेत अथवा त्यांचे वजन अधिक आहे. लठ्ठपणामुळे हृदयविकार, मधुमेह, कर्करोगामुळे अकाली मृत्यूचा धोका निर्माण होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

हेही वाचा:

 

Back to top button