अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये अंदाधुंद गोळीबार; एका पोलिस अधिका-यसह पाच ठार | पुढारी

अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये अंदाधुंद गोळीबार; एका पोलिस अधिका-यसह पाच ठार

पुढारी ऑनलाईन: अमेरिकेत पुन्हा एकदा बंदूक संस्कृतीचा कहर पहायला मिळाला आहे. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात ५ जणांचा मृत्यू झाला. तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेत एका पोलिस अधिकाऱ्याचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

एका न्यूज एजन्सीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. हल्लेखोर अचानक गर्दीच्या ठिकाणी आला आणि त्याने गोळीबार सुरू केला. समोर दिसणाऱ्या कोणालाही तो गोळ्या घालू लागला. या दरम्यान पाच जणांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाल्याचीही माहिती आहे. त्याचवेळी हल्लेखोराची एक गोळी तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाही लागली, यानंतर त्याचा त्या ठिकाणीच मृत्यू झाला.

गोळीबाराच्या या घटनेनंतर शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर पोलिसांकडून संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या हल्लेखोराची चौकशी सुरू असल्याचे, येथील पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

बंदूक संस्कृतीचा कहर सुरूच

अमेरिकेत बंदूक संस्कृतीचा कहर सुरूच आहे. गेल्या काही वर्षांत शेकडो लोकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून, त्यात अनेक लहान मुलांचाही समावेश आहे. अलीकडेच अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये शाळकरी मुलांना पुन्हा लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऑकलंडमधील शाळेच्या कॅम्पसमध्ये भीषण गोळीबार झाला, ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले. याआधीही शाळेत झालेल्या गोळीबारात १७ मुलांचा मृत्यू झाला होता. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात असे सांगण्यात आले की, यावर्षी अमेरिकेत ९६ लोक मारले गेले आहेत, ज्यात बहुतांश गोळीबाराच्या घटनांचा समावेश आहे. या मृत्यूंमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे.

Back to top button