कोल्‍हापूर: वीज कोसळल्यामुळे दीड एकर ऊस जळाला | पुढारी

कोल्‍हापूर: वीज कोसळल्यामुळे दीड एकर ऊस जळाला

किणी(कोल्‍हापूर), पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील घुणकी येथे आज सायंकाळी वीज कोसळल्यामुळे दीड एकर क्षेत्रातील ऊस जळाला. आग लागल्‍यानंतर काही वेळातच पावसाने हजेरी लावल्याने पुढील पंधरा ते वीस एकर ऊस जळण्यापासून वाचला.

गुरुवारी चार वाजल्यापासूनच परिसरात ढगांच्या गडगडाटासह विजा चमकत होत्या. घुणकी येथील गावाजवळ ओढ्याशेजारी दत्त मंदिराजवळील उसाच्या शेतात वीज कोसळली. मोठ्या कडकडाटासह कोसळलेल्या विजेमूळे उसाने पेट घेतला. बघता बघता आग पसरत गेली. यावेळी गावातील युवकांनी बोअरचे पाणी सुरू करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

दरम्‍यान, काही वेळातच पावसाला सुरुवात झाल्याने आग शांत झाली. अन्यथा या परिसरातील सुमारे पंधरा ते वीस एकर ऊस जळून खाक झाला असता. बाळासाहेब जाधव, महादेव बाबासाहेब माने, संपत पोपट सिद, बाजीराव मारुती माने, सर्जेराव ज्ञानदेव सिद, किसन भाऊ माने यांचा सुमारे दिड एकरातील ऊस जळून मोठे नुकसान झाले. प्रशासनाकडून तात्‍काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा 

सांगली: गुळवंचीत विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू; एकावर गुन्हा दाखल 

इचलकरंजी : लम्पीग्रस्त गायींना जीवदान, गो-पालकाकडून २० हजारांची औषधे भेट 

सांगली : लिफ्टच्या बहाण्याने भाजीपाला विक्रेत्या वृद्ध महिलेस लुटले

Back to top button