अन् विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्रीही झाले विद्यार्थी...! | पुढारी

अन् विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्रीही झाले विद्यार्थी...!

पनवेल, पुढारी वृत्‍तसेवा : 5 जी नेटवर्कच्या राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी निवडलेल्या पनवेलमधील शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: विद्यार्थी बनले. खुर्ची ऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले. तसेच विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी फाईव्ह जीचे महत्त्‍व सांगितले. क्रांतीकारक क्षणाचे आपण साक्षीदार असल्याचे सांगत शिक्षण, कृषी, आरोग्य, बॅंकिंगसह सर्वच क्षेत्रात फाईव्ह जी तंत्रज्ञानाने क्रांती होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशव्यापी फाईव्ह जी तंत्रज्ञानाचा शुभारंभ झाला. यामध्ये व्हर्च्युअल क्लासरुमसाठी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक आठमधील विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या कार्यक्रमास  मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बादली, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भुषण गगराणी, रायगडचे जिल्हाधिकारी
डॉ. महेंद्र कल्याणकर,  पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख सह अन्य मान्यवर देखील उपस्थित होते

राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी पनवेल राज्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. मीही तुमच्या सोबत आज विद्यार्थी झाल्याचे मुख्यंत्र्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

मुख्यमंत्री या वेळी म्हणाले, 5 जी तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. त्याचा फायदा सर्वाधिक शिक्षण क्षेत्राला होणार असून, विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. इंटरनेटला मिळणाऱ्या स्पीडचा फायदा अभ्यासासाठी करा गेम आणि सिनेमे डाऊनलोड करण्यासाठी नाही, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.या नवीन तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना डिजीटल दृष्यांच्या माध्यमातून विषय समजण्यास अधिक सोपे होईल आणि शाळेचे वर्ग सामान्य वर्गवारीत न राहता ते स्मार्ट क्लास होतील, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा 

Back to top button