Navratri festival 2022 : दुर्गाष्टमी पूजा आज की उद्या? वाचा कोणती तिथी ग्राह्य आणि पूजेचे महत्त्‍व! | पुढारी

Navratri festival 2022 : दुर्गाष्टमी पूजा आज की उद्या? वाचा कोणती तिथी ग्राह्य आणि पूजेचे महत्त्‍व!

पुढारी ऑनलाइन डेस्क : Navratri festival 2022 : गरबा-दांडियाच्या उत्साहात शारदीय नवरात्र 2022 चा उत्सव सर्वत्र साजरा होत आहे. 26 सप्टेंबरला घरोघरी मोठ्या भक्तिभावाने घटस्थापना झाली. त्यानंतर प्रत्येक माळेला देवीच्या उत्सवाचा जागर केला जातो. नवरात्री म्हणजे नऊ रात्रींचा समूह. यामध्ये प्रत्येक दिवशी देवीच्या वेगवेगळ्या नऊ रुपांची पूजा केली जाते. त्यापैकी अष्टमीला मोठे महत्त्‍व आहे. अष्टमीला ‘दुर्गाष्टमी’ देखील म्हटलं जाते. यंदा दुर्गाष्टमीची तिथी ही रविवारी सायंकाळपासून ते सोमवारी दुपारपर्यंत आहे. त्यामुळे दुर्गाष्टमीची पूजा नेमकी केव्हा करावी आणि या पूजेचे महत्त्‍व काय, याची सविस्तर माहिती घेवूया…

Navratri festival 2022 : दुर्गाष्टमी पूजा कधी

हिंदू पंचांगानुसार, अष्टमी तिथी 02 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 06.47 पासून सुरू होईल, जी 03 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 04:37 वाजता समाप्त होईल. 02 ऑक्टोबरला संध्याकाळपासून जरी अष्टमीची तिथी सुरू होत असली तरी जी तिथी सुर्योदयाला असते त्या तिथी ग्राह्य धरली जाते. दोन तारखेला सायंकाळी 6.47 सुर्यास्ताच्यावेळी तिथीला सुरू होत असल्याने दुर्गाष्टमी पूजा ही 03 ऑक्टोबर म्हणजे सोमवारीच करायची आहे. कारण सोमवारी सुर्योदयाच्या वेळी अष्टमीची तिथी आहे. अष्टमी तिथीला अभिजीत मुहूर्त सकाळी 11.46 ते दुपारी 12.34 पर्यंत असेल. या दरम्यान देवीची विधीव्रत पूजा केल्याने इच्छित फळ मिळते, अशी मान्यता आहे.

Navratri festival 2022 : दुर्गाष्टमी पूजेचे महत्व

तसे पाहिले तर हिंदू कालगणनेनुसार प्रत्येक मासाच्या शुक्ल पक्षातील अष्टमी ही दुर्गाष्टमी मानली जाते. दुर्गाष्टमीचे हे व्रत जो कोणी करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. दुर्गाष्टमीला देवीच्या संपूर्ण महागौरीच्या स्वरुपातील पूजा होते. दुर्गाष्टमीचे व्रत केल्याने घरात सुख-शांती नांदते. कुटुंब धन-धान्य आदी सर्व सुखांनी परिपूर्ण होते. मात्र, शारदीय नवरात्रीच्या वेळी येणा-या दुर्गाष्टमीचे महत्त्‍व दरमासाला येणा-या दुर्गाष्टमीपेक्षा खूप जास्त असते.

Navratri festival 2022 : महिषासूर या राक्षसाने जेव्हा त्रैलोक्यात हाहाकार माजवला होता. त्यावेळी देवांनी आदिशक्ती आदिमायेची आराधना केली. त्यावेळी देवी पार्वतीने दुर्गेचे रुप धारण करून महिषासूराशी युद्ध आरंभले. महिषासुराने सुरुवातीला सर्व आपल्या सर्व बलाढ्य सेनापतींना पाठवले त्यात चंड-मुंड, रक्तबीज या राक्षसांचा देवीने आधी नाश केला आणि सरतेशेवटी महिषासुराचा वध केला. महादुर्गाष्टमीपासून युद्धाचा अंत जवळ आला त्यामुळे नवरात्रीत येणा-या दुर्गाष्टमीला महादुर्गाष्टमी मानले जाते.

ज्यांना संपूर्ण नवरात्र व्रत करणे शक्य नसते त्यांनी किमान अष्टमीला एक दिवसाचे व्रताचरण केले तरी देवीचा कृपाशिर्वाद भेटतो. म्हणून या दिवशी देवीची शास्त्रानुसार परंपरेप्रमाणे विधी-व्रत पूजा करावी, अशी धारणा आहे.

हेही वाचा :

Back to top button