Saptshringigad : 5 वर्षानंतर प्रथेनूसार सप्तशृंगी गडावर होणार बोकड बळी विधी, न्यायालयाने बंदी उठवली | पुढारी

Saptshringigad : 5 वर्षानंतर प्रथेनूसार सप्तशृंगी गडावर होणार बोकड बळी विधी, न्यायालयाने बंदी उठवली

सप्तशृंगगड : पुढारी वुत्तसेवा

सप्तशृंगी गडावर (Saptshringigad) दसऱ्याच्या दिवशी श्री भगवतीच्या मंदीर पायऱ्यांवरील दसरा टप्प्यावर प्रथा – पंरपरेनूसार पूर्वी पासून सुरु असलेली बोकड बळी देण्याची प्रथा पाच वर्षांपासून प्रशासनाने बंद केलेली होती. या प्रशासनाच्या निर्णया विरुध्द आदिवासी विकास संस्था, धोंडाबे ता.सुरगाणा या संस्थेने जुलै २०१९ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती.

या जनहित याचिकेवेर आज गुरुवार (दि. २९) रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होवून न्यायालयाने याचिकाकर्त्याचे बाजूने निकाल देत अटी शर्तीनूसार बोकड बळी देण्याची प्रथा परंपरा पूर्ववत सुरु करण्यास परवानगी दिली आहे. याचिका कर्त्यांच्या बाजूने अॅड. दत्ता पवार यांनी बाजू मांडली. यासाठी भाविक सुधीर सोनवणे, सप्तशृंगी गड, नांदुरी व परीसरातील गावांतील ग्रामस्थांनी  पाठपूरावा केला.

सप्तशृंगी गडावर (Saptshringigad) नवरात्रोत्सवाची सांगता दरम्यान विजयादशमी- दसरा उत्सवाच्या दिवशी बोकड्याची गावातून सवाद्य मिरवणूक काढून गडावरील दिपमाळ परीसरातील दसरा टप्प्यावर बोकड्यास नेवून पांरपारिक पध्दतीने पुजाअर्चा करुन बळी देण्याची पूर्वापार चालत असलेली प्रथा सुरु होती. यावेळी बोकडबळी देतांना सप्तश्रृंगी देवी न्यासाच्यावतीने मानवंदना म्हणून हवेत गोळीबार करण्याची पंरपरा होती.

मात्र ११ सप्टेंबर २०१६ रोजी दसऱ्याच्या दिवशी परंपरेनूसार बोकड बळी देण्याचा विधी सुरु असतांना ट्रस्टच्या सुरक्षा रक्षकाकडून अनावधानाने रायफलमधून गोळी सुटून भिंतीवरील दगडावर आपटलेल्या गोळीचे छरे उडून १२ भाविक जखमी झाले होते. सुदैवाने यात जीवितहानी टळली होती.

या विधीत सहभागी होण्यासाठी भाविकांची गर्दी होत असल्याने भविष्यात या बोकड बळीच्या प्रथेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पोलीस प्रशासनाने ही प्रथा बंद व्हावी, अशी शिफारस जिल्हा प्रशासनाला केल्यामुळे सप्टेंबर २०१७ पासून गडावरील दसरा टप्पा व ट्रस्टच्या हद्दीत बोकड बळी व हवेत गोळीबार करण्याच्या प्रथेस तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बंदी घातलेली आहे.

दरम्यान दसऱ्याच्या दिवशी बोकडबळी देण्याची प्रथा ही वर्षानूवर्ष अखंड सुरु असल्याचे तसेच आदिवासी बांधवाच्या सानिध्यात श्री सप्तशृंगी मातेचे स्थान असून आदिवासी बांधव परंपरेनूसार धार्मिक कार्य करतांना बोकड बळी देण्याची परंपरा आहे. यात श्रध्दा व लोकभावना असल्याने बोकड बळी दिला नाही तर गडावर दरड कोसळणे, अतिवृष्टी या सारख्या नैसर्गिक आपत्ती येवून दुर्घटना होवू शकतात अशी आदिवासी बांधवा बरोबरच ग्रामस्थांचा समज आहे.

तसेच प्रशासनाने सदर बंदीचा निर्णय घेतांना ग्रामस्थ, ग्रामपंचायत, आदिवासी बांधव आदींना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप केलेला होता. तसेच देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी कोल्हापूर येथे भवानी मातेच्या मंदिरासमोर भवानी मंडपात तसेच तुळजापूर येथेही नवमीच्या दिवशी हजारो भाविक व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित बळी देण्याची परंपरा सुरु असतांना सप्तशृंगी गडावरील घातलेली बंदीचा निर्णय लोकभावना, श्रध्दा व धार्मिक भावना दुखवणारी आहे.

देवी महात्म असलेल्या दुर्गासप्तशती, नवचंडी स्त्रोत्र आणि इतर धार्मिक ग्रथांतही पशुबळी देण्याबाबत उल्लेख आढळतो. याबाबत सप्तशृंगी गड, नांदुरी, मोहनदरी, गोलदरी, दरेगांव येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्यावतीने गेल्या सहा वर्षांपासून प्रशासनानस अटी शर्ती नूसार दसरा टप्प्यावर बोकड बळी देण्यास परवानगी द्यावी अशी मागणी सातत्याने होत असल्याचे याचिकाकर्तीने याचिकेत उल्लेख करीत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

या जनहित याचिकेवर गुरुवारी दि. २९ रोजी सुनावणी झाली असून यात न्यायालयाने याचिकाकर्ते आदिवासी विकास संस्था, धोडंबे सह सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कळवम, तहसिलदार कळवण, पोलिस निरीक्षक कळवण, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगी गड व नांदुरी ग्रामपंचायत यांनी सहमतीने प्रशासनाने बंद केलेली प्रथा पूर्वरत पणे अटी शर्तीनूसार करण्यास हरकत नसल्याची एकत्रीरीत्या मान्य असल्याचे पत्र न्यायालयात सादर केले असतांना न्यायालयाने बोकड बळीची बंदी उठवत प्रथा पंरपरेनूसार बोकड बळी देण्यास परवानगी दिली आहे. त्यामूळे ५ ऑक्टोंबर रोजी दिला जाणारा यज्ञ आहूतीचा बोकड बळी विधी हा गडावरील दसरा टप्पा येथे पाच वर्षानंतर पुन्हा होणार असल्याने भाविक, सप्तशृंगी गड, नांदुरी, मोहनदरी, दरेगाव, मार्केड पिंप्री ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

Back to top button