Eknath Shinde : भगवान स्वामीनारायण व मोंदीच्या आशिर्वादानेच मी मुख्यमंत्री झालो | पुढारी

Eknath Shinde : भगवान स्वामीनारायण व मोंदीच्या आशिर्वादानेच मी मुख्यमंत्री झालो

पंचवटी, नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्वामीनारायण मंदिराच्या भूमिपूजनाला नाशिकमध्ये ११ नोव्हेंबर २०१७ आलो तेव्हा मी मंत्री होतो आणि आता मुख्यमंत्री होऊन प्राणप्रतिष्ठेला आलो आहे. हे माझे भाग्य असून, भगवान स्वामीनारायण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादानेच मी मुख्यमंत्री झाल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. स्वामीनारायण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त पंचवटीतील केवडीवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

नाशिक ही प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून, मंत्रभूमी म्हणूनही या नगरीला वेगळी ओळख आहे. गोदावरीच्या तटावर बसलेले हिंदूतीर्थ यात्रेचे हे प्रमुख केंद्र आहे. आता स्वामीनारायण मंदिराच्या रूपाने आणखी एक भव्य दिव्य कलाकृती येथे साकारल्याने शहराचे धार्मिक महत्त्व वाढले असून, हे स्थळ पवित्र तीर्थस्थळ म्हणून उदयास येईल, यात्रेकरूंसाठी मंदिर आकर्षणाचे केंद्र बनेल. नाशिकला धार्मिकदृष्ट्या फार महत्त्व आहे. कलेचा उत्तम नमुना म्हणून या मंदिराकडे बघता येईल. मंदिराची साकारलेली कलाकृती अद्भुत व आकर्षित असल्याने भविष्यात तीर्थ व पर्यटनस्थळ म्हणून विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे मंदिर निर्माण करणारी स्वामीनारायण ही संस्था त्यागाच्या भावनेने जगभर सेवा करत असून, यातून आदिवासी लोकांचा उत्कर्ष, व्यसनमुक्ती यासारखे १५० हून अधिक कामे संस्थेमार्फत केली जात आहेत. समाजाला जोडण्याचे काम करणाऱ्या या संस्थेच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची इच्छा मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.

गैरवापरावर अंकुश हवा

गेली दोन वर्षे कोरोना काळात राज्यातील लोक निर्बंधांमुळे अडकून बसली होती. गेल्या दोन अडीच महिन्यांत आपल्या सरकारने सर्व सण आणि उत्सवांवरील निर्बंध हटवून लोकांना यातून मुक्त केले आहे. तुम्ही लोकांची सेवा करा, केंद्र सरकार तुम्हाला हवी ती मदत करेल, असे स्पष्ट आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला दिले आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनातील सरकार स्थापन झाले असून, प्रत्येकाचे भले करणे हाच आपला अजेंडा असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राज्यात सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आले असून शेतकरी, कामगार, व्यापारी, कष्टकरी, महिला, शिक्षक, विद्यार्थी या सर्वांना पुढे घेऊन जाण्याचे व राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचे काम हे सरकार करणार असल्याची भावना राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

स्वामीनारायण संस्थेचे प्रमुख परमपूज्य महंत स्वामी महाराज यांनी मंदिराच्या निर्माणाचे कौतुक करताना उपस्थित त्यांना प्रेमाचा व शांततेचा संदेश दिला. मंदिराचे पावित्र्य जपण्याचे आवाहन त्यांनी केले. सद्गुरू परमपूज्य विवेक सागरची स्वामी यांनी स्वामीनारायण मंदिर नाशिक शहराचे वैभव असल्याचा गौरव केला मंदिराची निर्मिती विश्वशांतीसाठी केल्याचे सांगताना अंधश्रद्धा दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रमुख स्वामी महाराज, विवेकसागर स्वामी, पूज्य महाव्रत दास, पूज्य श्रुतीप्रकाश दास, ब्रह्मस्वरूप विवेकसागरदास स्वामी, घनश्यामचरणदास महाराज, ईश्वरचरणदास महाराज, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, राहुल ढिकले, सीमा हिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हवेत फुगे..

यावेळी भजन, संगीत, प्रवचन सुरू होते, तसेच गुलाबी व सफेद फुगे उपस्थित सर्व भाविकांकडे देण्यात आलेले होते व मुख्यमंत्र्यांच्या स्वागतानंतर सर्व फुगे हवेत सोडण्यात आले. यामुळे भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

जेठालाल यांची उपस्थिती

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमधील जेठालाल फेम दिलीप जोशी यांचीदेखील कार्यक्रमाला उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांचे भाषण आटोपताच मंदिरात दर्शन घेऊन ते मार्गस्थ झाले.

मराठी चालेल ना..?

हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेत संवाद साधताना मुख्यमंत्र्यांना अडचण आल्याने त्यांनी उपस्थित भाविकांना मराठीत चालेल ना? अशी विचारणा केली, तितक्याच उत्साहाने भाविकांनी हो.. असे उत्तर दिले.

सोन्याची मूर्ती ?

स्वामीनारायण भगवान यांची जी मूर्ती मुख्यमंत्र्यांना महंतांच्या हस्ते भेट देण्यात आली. ती सोन्याची असल्याची कार्यक्रमात चर्चा रंगली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच भाषण करताना मुख्यमंत्री अडखळले. दादा भुसेंचा महाराष्ट्राचे पालकमंत्री असा उल्लेख केला. नंतर पुन्हा सावरून त्यांनी नाशिकचे पालकमंत्री असा उल्लेख केला.

हेही वाचा :

Back to top button