आमच्या मुडद्यांवर खुशाल राज्य करा; राजू शेट्टी यांचे आक्रोश यात्रेत आव्हान | पुढारी

आमच्या मुडद्यांवर खुशाल राज्य करा; राजू शेट्टी यांचे आक्रोश यात्रेत आव्हान

नृसिंहवाडी, पुढारी ऑनलाईन :तुम्हाला राज्य करायचे तर आमच्या मुडद्यांवर करा, असे आव्हान देत राजू शेट्टी यांनी आक्रोश यात्रेची सांगता केली. महापुरामुळे नदीकाठचा माणूस उद्ध्वस्थ झाला आहे. आमची लाकडं नदीवर गेली तरी तुम्ही लक्ष द्यायला तयार नाही, असा आरोप त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर केला.

नृसिंहवाडी येथे ते पूरग्रस्तांसमोर बोलत होते. यावेळी मोठा पोलिस बंदोब्त तैनात करण्यात आला होता.

तत्पुर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नृसिंहवाडी पुलाजवळ पोलिसांना चकवा देत पंचगंगा काठावरून नदीत उड्या मारल्या.

त्यामुळे पोलिस आणि रेस्क्यू फोर्सची तारांबळ उडाली.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले, पूरग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी सरकारला साकडे घालण्यासाठी आम्ही ही यात्रा काढली.

मात्र, सरकारला जाग आलेली नाही.

गेल्या १५ वर्षांत पाच वेळा महापूर आला. खरं पहायला गेलं तर अतिक्रमित बांधकामे आणि नियोजनाअभावी पूर येत आहे.

कोल्हापुरातील भरावामुळे दीड फूट पूर वाढला आहे.

महापुरावर कायमस्वरुपी उपाय करणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नाही. रस्ते, पूल, आणि भराव टाकून बांधाकमे केल्याने कोल्हापूर बुडाले.

याचा कुणीही अभ्यास करत नाही. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अशास्त्रीय दृष्ट्या बांधलेल्या काही पुलांमुळे महापूर आला आहे.

पंचगंगा आणि कृष्णेच्या पुरावर कायमस्वरुपी उपाय करण्याची गरज आहे.

अलमट्टी धरणामुळे नुकसान झाले की नाही हा संशोधनाचा विषय आहे.

मात्र, धरणाची उंची वाढली तर मात्र, कायमस्वरुपी पूर येईल.

 सीमाभाग हैराण

हिरण्यकेशी, ताम्रपणी आणि घटप्रभा नदीच्या पुरामुळे सीमाभाग हैराण झाले आहेत.

नद्यांच्या महापुरामुळे आयुष्य उद्ध्वस्थ झाले आहे. केंद्रीय जल आयोग या सगळ्याचा विचार करणार आहे की नाही?

गुजरातला वादळाचा तडाखा बसला आणि केंद्रीय पथकाने पाहणी केली.

त्यानंतर तेथे पंतप्रधानांनी १००० कोटीची मदत जाहीर केली. हेच वादळ कोकणात आले. मात्र, त्याकडे कुणी फिरकले नाही.

केंद्रीय आपत्ती निवारण निधी हा कुणाच्या बापाचा नाही. हा निधी नरेंद्र मोदी यांनी तयार केला नाही.

हा निधी जवाहरलाल नेहरूंनी निर्माण केला.

तेव्हापासून भारताचे अर्थमंत्री अर्थसंकल्पात काही पैसा काढून ठेवतात. कोल्हापुरात महापूर आला. ही राष्ट्रीय आपत्ती नाही का?

केंद्राचे पथक का आले नाही? केंद्र सरकारच्या अशा सापत्न भावामुळे सर्वसामान्य शेतकरी, लहान उद्योजकांचे कंबरडे मोडले आहे.

आमचं सर्वस्व वाहून गेलं, तिथं शांत राहण्याचे आवाहन का करता? असा सवालही त्यांनी केला.

तसेच तुम्हाला राज्य करायचं तर आमच्या मुडद्यांवर करा. हा आमचा सत्याग्रह आहे. त्यामुळे आम्हाला परिणामांची चिंता नाही.

रोजगार हमीतून कामे द्या

जिल्हाधिकाऱ्यांकडे राजगार हमीचा पैसा पडून आहे. गेली तीन महिने शेतकऱ्याला काम नाही.

अशा वेळी रोजगार देण्याची भूमिका घेतली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसा आदेश द्यावा, अशी मागणी केली.

हेही वाचा:

Back to top button