नायर हॉस्पिटल साठी १०० कोटींचा विशेष निधी : मुख्यमंत्री | पुढारी

नायर हॉस्पिटल साठी १०० कोटींचा विशेष निधी : मुख्यमंत्री

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महापालिकेच्या बाई य. ल. नायर हॉस्पिटल च्या शतकपूर्ती निमित्ताने या हॉस्पिटलला महापालिका व राज्य शासन यांच्याकडून संयुक्तरित्या 100 कोटी रुपयांचा विशेष निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली.

मुंबई महानगरपालिकेच्या बाई य. ल. नायर हॉस्पिटलचा शतकपूर्ती सोहळा शनिवार 4 सप्टेंबरला हॉस्पिटलच्या सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, स्थानिक आमदार यामिनी जाधव, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आदी मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, नायर हॉस्पिटलचा शंभर वर्षांचा प्रवास थक्क करणारा आहे. हे हॉस्पिटल स्वातंत्र्याच्याही 25 वर्षे आधी सुरू झाले. देव फक्त मंदिरात न राहता हॉस्पिटलमध्येही वसतो. व्यथा घेऊन आपण मंदिरात जातो, तसे रुग्ण व्याधी घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात. डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय असे सर्वजण देवाच्या रूपातच सेवा करतात. कोविड काळात कौतुक होत असलेल्या मुंबई मॉडेलचे खरे मानकरी सर्व डॉक्टर्स असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी भारतीय टपाल खात्याकडून नायरवर विशेष टपाल तिकिटाचे आवरण प्रकाशित करण्यात आले. हॉस्पिटल आणि डाक कार्यालये यांच्याद्वारे दिली जाणारी जनसेवा ही सारखीच असते, असे मत मुख्य पोस्टमास्तर जनरल हरिशचंद्र अग्रवाल यांनी व्यक्त केले. कोविड काळामध्ये टपाल विभागाने औषधे आणि इतर सामग्री आवश्यक ठिकाणांपर्यंत पोहोचविण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केंद्र सरकारनेही टपाल खात्याचा गौरव केला असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

Back to top button