कोपरगाव : दरोड्यातील सराईत आरोपी २४ तासाच्या आत जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई | पुढारी

कोपरगाव : दरोड्यातील सराईत आरोपी २४ तासाच्या आत जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

कोपरगाव प्रतिनिधी :  तालुक्यातील संवत्सर येथील नौचारी सोनवणे वस्तीवर सात ते आठ जणांनी दरोडा टाकला होता. यातील तीन आरोपींना पोलिसांनी 24 तासात जेरबंद केले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी फिर्यादी सौ. कविता अनिल सोनवणे वय ५० रा. नऊचारी, संवत्सर, ता. कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली होती. दाखल केलेल्या तक्रारीवरून कोपरगाव पोलिसांनी दरोडयाचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाचे तपासाबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील, यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा सखोल व बारकाईने समांतर तपास करुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.

तपासादरम्यान पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा आरोपी दिलीप विकास भोसले रा. कारवाडी शिवार, कोकमठाण, ता. कोपरगाव याने त्याचे साथीदारांसह केला आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी वरील पथकासह आरोपीचे ठावठिकाणाबाबत माहिती काढून कारवाडी शिवार, कोकमठाण, ता. ‘कोपरगाव येथे सापळा लावला. आरोपी सदर ठिकाणी असल्याची खात्री होताच पोलीस पथकाने छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहुल लागताच काही इसम पळून जाऊ लागले. त्यावेळी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पाठलाग करुन शिताफीने कारवाडी शिवारातून दिलीप उर्फ गिल्या विकास भोसले, अनिल अरुण बोबडे, राहुल दामू भोसले अशांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे वरील गुन्हयाबाबत चौकशी केली असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर अधिक सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा साथीदारांसह केला असल्याची कबुली दिली.

वरील तीनही आरोपींविरुध्द गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील, पोलीस अधीक्षक मनोज पाटील अहमदनगर, श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम, उप विभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी संजय सातव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

 

Back to top button