जावेद अख्‍तर म्‍हणाले, संघ आणि बजरंग दलाचे समर्थक तालिबान्‍यांसारखेच | पुढारी

जावेद अख्‍तर म्‍हणाले, संघ आणि बजरंग दलाचे समर्थक तालिबान्‍यांसारखेच

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : प्रसिद्‍ध गीतकार जावेद अख्‍तर यांनी तालिबान्‍यांवर टीका करताना राष्‍ट्रीय स्‍वंयसेवक संघावरही टीकास्‍त्र साेडले आहे. तालिबानी हे भंयकर आहेत आणि त्‍यांची कृती निंदनीयच आहे,मात्र राष्‍ट्रीय स्‍वंयसेवक संघ ( आरएसएस) , विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांचे समर्थन करणारेही तालिबान्‍यांसारखेच आहेत, असे जावेद अख्‍तर यांनी म्‍हटले आहे.

संकुचित विचार करणारे तालिबानचे समर्थक

एका वृत्तवाहिनीतील चर्चेवेळी जावेद अख्‍तर म्‍हणाले की, तालिबान आणि तालिबान सारखेच होण्‍याची इच्‍छा हा एकसारखाच विचार आहे. भारतातील काही मुस्‍लिमांनी तालिबान्‍यांचे समर्थन केले आहे. मात्र ही संख्‍या खूपच कमी आहे. देशातील मुस्‍लिम युवकांना रोजगार, शिक्षण आणि चांगल्‍या शाळा हव्‍या आहेत. मात्र काही संकुचित विचार करणारे तालिबानचे समर्थन करत आहेत. महिलांना गौण स्‍थान दिले जाते. हा विचारच तुम्‍हाला मागे घेवून जाणार आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

तालिबानचा विचार भारतीयांना आकर्षित करणार नाही

तालिबान आणि जगातील अन्‍य ठिकाणी धर्माच्‍या आधारे राष्‍ट्र स्‍थापन करण्‍याचे स्‍वप्‍न पाहणार्‍यांची मानसिकता एक सारखीचा आहे. राष्‍ट्रीय स्‍वंयसेवक संघ ( आरएसएस) , विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांचे समर्थन करणारेही तालिबान्‍यांसारखेच आहेत. भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. बहुसंख्‍य नागरिक धर्मनिरपेक्ष आहेत. तालिबानचा विचार कोणत्‍याही भारतीय नागरिकांना आकर्षित करणार नाही. या देशातील बहुतांश नागरिक हे सभ्‍य आणि सहनशील आहेत. या विचारांचा सन्‍मान होण्‍याची गरज आहे, अशी अपेक्षाही त्‍यांनी या वेळी  व्‍यक्‍त केली.

अफगाणिस्‍तान तालिबान्‍यांनी ताब्‍यात घेणे पूर्वनियोजित कटच

अफगाणिस्‍तान तालिबान्‍यांनी ताब्‍यात घेणे हा पूर्वनियोजित कटच आहे. या देशात लष्‍कर होते. तरीही काही जण कार आणि ट्रकमध्‍ये येतात आणि सत्ता काबीज करतात हे कसे शक्‍य आहे. निश्‍चितच हा कट अमेरिका, अफगाणिस्‍तानमधील अमेरिकेने चालवले सरकार आणि तालिबान यांनी एकत्रीत येवून  रचला असावा, असा आरोपही त्‍यांनी यावेळी केला.

हेही वाचलं का ? 

पाहा व्‍हिडिओ : महाराष्ट्राची गोधडी थेट विदेशात पोहचली |

 

 

Back to top button