विसर्जन शहाणपणाचे… | पुढारी

विसर्जन शहाणपणाचे...

सुनील माळी, निवासी संपादक, पुढारी, पुणे

निर्बंधमुक्त आणि उत्साही वातावरणातील गणेशोत्सव या मुख्यमंत्ऱ्यांनी केलेल्या घोषणेची तंतोतंत अंमलबजावणी पुण्यातील दहा दिवसांच्या उत्सवात झाली आणि त्यावर कळस चढला तो मिरवणुकीत, मात्र निर्बंधमुक्त म्हणजे अनिर्बंध आणि उत्साहाला लगाम नाही म्हणजे उन्माद असा त्याचा अर्थ लावण्यात आला. जाणत्या पुणेकरांना हा अर्थ, ही उन्मादी मिरवणूक मान्य आहे का ?

मिरवणुकीवर निर्बंध म्हणजे काहीएक किमान नियम लावण्यात आले ते गेल्या १२९ वर्षांच्या मिरवणुकीच्या अनुभवातून तसेच प्रमुख काऱ्यकर्ते-अनुभवी पोलिस अधिकारी आणि पत्रकारांचे लेखन यांच्या आधारे. जवळपास सर्वमान्य असे ते नियम यंदा पूर्णपणाने रद्द करण्याची घोषणा झाली अन त्यामुळे मिरवणूक कोणाच्याच हातात राहिली नाही. मानाच्या पहिल्या गणपतींचे विसर्जन संध्याकाळपर्यंत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उजाडेपऱ्यंत अधिकाधिक मंडळे मिरवणुकीतून पुढे जावी, मंडळांनी केलेल्या आकर्षक विद्युतरोषणाईचा तसेच देखाव्याचा आनंद रात्रीच्या वेळी पुणेकरांना घेता यावा, यासाठी ही धडपड होती.

आतापऱ्यंतच्या अनुभवावरून विविध कारणांनी बहुसंख्य मंडळांना दिवस उजाडल्यानंतरच मुख्य मिरवणुकीत सहभागी होता आले होते. त्याचा विचार करून ठरविण्यात आलेले हे नियम यंदा एकदमच उठविल्याने यंदाची मिरवणूक विरस करणारी ठरली. प्रत्येक मंडळापुढे ढोल-ताशाच्या पथकांची संख्या कमाल दोन आणि प्रत्येक पथकात पंचवीस ते चाळीस ढोलची आखलेली मऱ्यादा उठल्याचा गैरफायदा घेण्यात आला. काही मंडळांपुढे पाच तर काही मंडळांपुढे सात पथके होती. तसेच काही पथकातील ढोलची संख्या तब्बल ६७ आणि ताशांची संख्या तब्बल चाळीसपऱ्यंत गेली. यांमुळे अशा मंडळांनी मिरवणुकीचा मोठा वेळ खाल्ला.

शेवटच्या मंडळांपैकी मंडईचा गणपती रात्री एक ते दोनच्या दरम्यान लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकात दाखल होतो आणि त्यापाठोपाठ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती येतो. यंदा सकाळी उजाडल्यावर म्हणजे साडेसहा वाजता मंडई गणपती बेलबाग चौकात आला, म्हणजे चार ते साडेचार तास उशिरा. साहजिकच दगडूशेठ गणपतीला बेलबाग चौकात यायला पावणेआठ वाजले. या दोन्ही मंडळांना दिवसा लक्ष्मी रस्त्यावरून जावे लागले. याला जबाबदार कोण ?

”आमचे हात बांधले गेले आहेत, आम्हाला वरून आदेश आहेत”, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने काल मिरवणूक सुरू असतानाच ‘पुढारी’च्या या प्रतिनिधीला सांगितले. नियमभंगाचा आम्ही केलेला दंडही आम्हाला माफ करावा लागल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे पुण्याच्या मिरवणुकीतील रस जाऊन चोथा उरेल, याचे भान या वरून आदेश देणाऱ्यांनाही नव्हते. ‘शेवटच्या मानाच्या गणपतींच्या आधी आम्ही सांगतो त्या मंडळांना सोडा’ असाही आदेश ‘वरून’ आल्याने त्यांना लक्ष्मी रस्त्यावर यायला उशीर लागला. याची दाद पुणेकरांनी कोणाकडे मागायची ?

स्पीकरच्या मोठमोठ्या भिंतींमधून कर्णकर्कश्य गाणी, त्यावर नाचणारे बेधुंद काऱ्यकर्ते (?) हीच टिळक रस्त्यावरील मिरवणुकीची स्थिती गेली अनेक वर्षे आहे. या रस्त्यावर जाण्याआधी पुणेकरांच्या कानाची स्थिती आणि त्यावरील गणपतींच्या गाड्यांपुढून स्वारगेटला  पोचल्यानंतरची कानाची स्थिती तपासली जावी. छातीचे ठोके चुकतील एवढ्या मोठ्या आवाजातील आवाजाला डेसिबलचे नियम लागू नाहीत का ?

लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीत १३७ गणपती सहभागी झाले होते. या मिरवणुकीला लागलेल्या ३१ तास ३३ मिनिटांपैकी मानाच्या म्हणवल्या जाणाऱ्या सात-आठ मंडळांनी १५ तास ३५ मिनिटे घेतली. म्हणजेच उरलेल्या १२९ गणपतींच्या वाट्याला केवळ १५ तासच आले. ‘मिरवणुकीतील सर्व गणपती हे टिळकांचेच आहेत’, असे लोकमान्य टिळक म्हणून गेले. त्याचा अर्थ मिरवणुकीतील सर्वच गणपती तितकेच महत्त्वाचे आणि मानाचे आहेत. मग हा इतर मंडळांवर अन्याय नाही का ?

लक्ष्मी रस्त्यावर येण्यासाठी बाजीराव आणि शिवाजी रस्त्यावर उभ्या असलेल्या गणपतींची रांग पाहिली तर त्यातील अनेक मंडळे गोखलेनगर, वडारवाडी, एरंडवणे, हडपसर या भागांतील असतात आणि यंदाही तशीच ती होती. या मंडळांना कर्वे रस्ता, हडपसर या भागांतील मिरवणुकीत जाता आले नसते का ?

पोलिसांनी, उत्सवाच्या कर्त्या-धर्त्यांनी त्यांच्याशी तशी कधी चर्चा केली आहे का ? पुण्यातील मिरवणुकीच्या नियमनाची जबाबदारी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या फळीतील बहुतेक अधिकारी पुण्यातील मिरवणूक पहिल्यांदाच पाहात होते. त्यांना मिरवणुकीच्या खाचाखोचा, काऱ्यकर्त्यांची वागणूक, मिरवणुकीचे मार्ग यांपैकी कशाचीही माहिती नाही. असे असताना त्यांनी पुण्यातील मिरवणुकीत अनेक वर्षे काम केलेल्या अशोक चांदगुडे, भानुप्रसाद बर्गे, मकरंद रानडे आदी निवृत्त अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहिती घ्यायला काय हरकत होती ?

पुण्यातील मिरवणूक लांबण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी सक्रियतेने काम करण्याची गरज वरिष्ठ अधिकाऱ्याकडे मिरवणूक सुरू झाल्यानंतरच्या काही तासांमध्येच व्यक्त केली असता त्यांनी आपल्याकडे काही हुकमाचे पत्ते असल्याचे ठामपणाने सांगितले. हे पत्ते खिशात घेऊन फिरण्यापेक्षा निवृत्त अधिकारी, ज्येष्ठ काऱ्यकर्ते, पत्रकार यांना विश्वासात घेऊन नियोजन का केले नाही ? शेवटी हे पत्ते हुकमाचे नसून दुर्री, तिर्री असे फुटकळ असल्याचे दुसऱ्या दिवशी लक्षात आले. … महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. उत्सवाला वळण लावण्यासाठी उत्सवाच्या कर्त्या-धर्त्यांनी पुढे आले पाहिजे.

काही मंडळांनी एकत्र येऊन विधायक व्यासपीठ, जय गणेश व्यासपीठ केले आहे खरे, पण सर्वसमावेशक असे एक व्यासपीठ करून त्यावर मिरवणूक अधिक रसरशीत करण्यासाठी निर्णय होण्याची गरज आहे. उत्सवात बदल करण्याचे काम एकट्या-दुकट्याच्या पुढाकाराचे नाही आणि असे एकचएक सर्वमान्य व्यक्तिमत्त्व जेहत्ते कालाचे ठायी दिसत नाही. तसे आले तरी त्याला सगळेजण जुमानणार नाहीत. गण-पती हा गणांचा म्हणजे समूहाचा नायक आहे. त्याच्या उत्सवालाच नायक नसेल तर त्या बुद्धिदात्याकडून आपण काय घेतले ? त्यामुळे सामूहिकरित्या असे व्यासपीठ स्थापण्याची बुद्धी त्या देवतेकडून मिळो. अन्यथा विसर्जन होईल, पण ते शहाणपणाचे असेल…

हे ही वाचा…

Hindutva : “ना गणेशोत्सवाच्या, ना दहीहंडी उत्सवाच्या शुभेच्छा; मोहीत कंबोज यांनी हिंदुत्वावरुन उद्धव ठाकरेंना डिवचलं 

गणेशोत्सव : कोकणच्या ‘महाउत्सवास’ आजपासून प्रारंभ!

Back to top button