कासचा हंगाम शनिवारपासून बहरणार; 9 सप्टेंबरपासून ऑनलाईन बुकिंग : 100 रुपये शुल्क | पुढारी

कासचा हंगाम शनिवारपासून बहरणार; 9 सप्टेंबरपासून ऑनलाईन बुकिंग : 100 रुपये शुल्क

बामणोली : पुढारी वृत्तसेवा जागतिक वारसास्थळ असणार्‍या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम यावर्षी तब्बल 10 दिवस उशिराने सुरू होत असून यावर्षीचा हंगाम हा शनिवार, दि. 10 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. 9 सप्टेंबरपासून पर्यटकांना ऑनलाईन बुकिंग करता येणार असून त्यासाठी www.kas.ind.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. प्रतिपर्यटक 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना 20 रुपये शुल्क राहील. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी व जिल्हा पोलिसप्रमुख अजयकुमार बन्सल यांच्या टीमने मंगळवारी कास पठाराची पाहणी करून याबाबतचे निर्णय घेतल्याची माहिती कास पठार कार्यकारी समिती तसेच वनविभाग सातारा यांच्याकडून देण्यात आली आहे.

कास पठार कार्यकारी समितीकडून हंगाम सुरू करण्याबाबतचे सर्व नियोजन करण्यात आले असून यावर्षी हंगामासाठी साधारणपणे 150 स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. कास पठाराच्या दोन्ही बाजूला प्रशस्त पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून मोठी वाहने कास धरणानजीकच्या पार्किंगमध्ये पार्क करण्यात येतील तर छोटी वाहने ही घाटाई फाट्यानजीक असणार्‍या कासानी येथील पार्किंगमध्ये पार्क करण्यात येतील. दोन्ही बाजूकडून पाठारावर जाणार्‍या पर्यटकांसाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच पठारावर फुले पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना स्वच्छतागृह तसेच पिण्यासाठी मिनरल वॉटर याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही.

कास पठारावर सद्यस्थितीत गेंद, सीतेची आसवे, सोनकी, चवर यासह अनेक प्रजातींची फुले फुलायला सुरुवात झाली असून एक ते दोन दिवसात फुलांचे गालीचे तयार व्हायला देखील सुरुवात होणार आहे. त्यामुळे कास पठारावर फुले पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना आता कास पठारावरील फुलांच्या बहराचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे. हंगाम जरी लांबला असला तरी हा हंगाम पुढे भरपूर काळ टिकणार असल्याचे मत कास पठार कार्यकारी समितीमधील अनुभवी प्रशिक्षक तसेच वन विभागातील जाणकार व तज्ञ व्यक्तींकडून सांगण्यात आले आहे. हंगाम नियोजनाबाबत दि. 8 सप्टेंबर रोजी वनविभाग व कास पठार कार्यकारी समिती यांची बैठक होणार असून दि. 9 सप्टेंबरपासून पर्यटकांना ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. ऑनलाईन बुकिंग केलेल्या पर्यटकांनाच कास पठारावर प्रवेश दिला जाणार आहे.

हेही वाचा

Back to top button