मरेपर्यंत वेठबिगार मजूर बनून राहील पण मुलीच्या लग्नासाठी खर्च द्या, एका आईची सरपंचांना आर्त विनंती | पुढारी

मरेपर्यंत वेठबिगार मजूर बनून राहील पण मुलीच्या लग्नासाठी खर्च द्या, एका आईची सरपंचांना आर्त विनंती

पुढारी ऑनलाइन डेस्क : देश स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करत आहे. पण आजही समाजात अशा काही गोष्टी घडत आहेत, ज्यामुळे हृदय पिळवटून निघते. अशीच एक बातमी चर्चेत आली. एका आईने मुलीच्या लग्नासाठी पैसे हवेत म्हणून आयुष्यभर पैसे न घेता वेठबिगारी करेन झाडू-पोचापासून सर्व कामे करेन पण माझ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे द्या. लग्नात फक्त 10-12 व-हाडी येतील त्यांच्या सेवेसाठी मला आर्थिक मदत करा, अशी आर्त विनवणी करणारे पत्र, सरपंचांना लिहिले. हे पत्र वायरल झाले आणि या बातमीने सर्वांच्याच अंतःकरणाला पाझर फोडला. हे प्रकरण जम्मूच्या सीमावर्ती भागातील आरएस पुराचे आहे.

आरएस पुराच्या एका गावात ही महिला राहते. केवळ गाईचे दूध विकून त्यांच्या घराचा घरखर्च चालतो. घर देखिल फक्त एकाच खोलीचे आहे. त्यांच्या मुलीचे लग्नाचे वय झाले आहे. लग्न जुळले असून लग्नात फक्त 10 ते 12 व-हाडी येतील. मात्र, त्यांच्याही आदरातिथ्याचा खर्च ती करू शकत नाही. तिने सुरुवातीला पैशांची जुळवा-जुळव करण्याचा मोठा प्रयत्न केला. मात्र, तिच्याकडे पैसे साचले नाही.

इतरांप्रमाणेच आपल्या मुलीचे लग्न देखिल मोठ्या थाटामाटात व्हावे, अशी या महिलेची इच्छा आहे. त्यासाठी तिची कुठलेही कष्ट करायची तयारी आहे. त्यासाठी या महिलेने ब-याच दिवसांपासून पैशांची साठवणूक केली. मात्र, काही कारणास्तव लग्नाच्या खर्चासाठी पुरेसे पैसे जमले नाही. शेवटी थकून हारलेल्या या महिलेने गावातील सरपंचांना पत्र लिहून मदतीची याचना केली. यामध्ये तिने मदत मिळावी यासाठी आयुष्यभर सरपंचाच्या घरी वेठबिगार मजूर म्हणून काम करण्याची तयारी दर्शविली.

पत्रात तिने म्हटले आहे की, मी घरातील झाडू काढण्यापासून मोपस्यापर्यंतची सर्व कामे करायला तयार आहे. जिवंत असेपर्यंत तुमच्या घरात वेठबिगार मजूर बनून राहील. पण मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठी पैसे द्या. लग्नात 10-12 व-हाडी मंडळी असतील. त्यांचा मला खर्च द्यावा.

सरपंच शामलाल भगत यांनी सांगितले की, महिलेच्या या ऑफरने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. महिलेला वेठबिगार मजूर बनण्याची गरज नाही, असे आश्वासन दिले आहे. त्यांच्या मुलीचे लग्न थाटामाटात होणार आहे. सर्वजण मिळून सहकार्य करतील. अल्पोपाहारापासून इतर व्यवस्थांपर्यंत मदत होईल. तसेच सर्व प्रकारची मदत केली जाईल. त्यांनी लग्नाच्या तयारीला लागवे.

Back to top button