तलवारीचा धाक दाखवून कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशाची लुट | पुढारी

तलवारीचा धाक दाखवून कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशाची लुट

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

कल्याण रेल्वे फलाटावरील एका प्रवाशाला एका गुंडाने तलवारीचा धाक दाखवून लुट केल्याची घटना  रविवारी रात्री २९ ऑगस्ट रोजी ११ वाजता घडली. ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी गुंडाला पकडून अटक केली. दारु पिण्याची सवय असलेल्या निखील याने दारूसाठी पैसे हवे असल्याने हा प्रकार केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, निखील गणेश वैरागर ( २१ ) असे अटक आरोपीचे नाव आहे. सिक्युरीटी गार्ड असलेले आंबिवली मध्ये राहणारा प्रीतम पाटील हा ३१ वर्षीय तरुण रविवारी २९ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घरी जाण्यासाठी तो कल्याण फलाट क्रमांक २ नंबरवर लोकलची वाट पाहत उभा होता.

इतक्यात पुलावरून त्याच्या जवळ आलेल्या निखीलने त्याच्याकडील तलवारीचा धाक दाखवत जवळ असलेले पैसे आणि मोबाईल दे नाहीतर ठार मारण्याची धमकी दिली. मात्र त्याच्या सुदैवाने लोकलच्या प्रतीक्षेत असलेला आणखी एक प्रवासी तलवार बघून पुढे येत दोघांनी मिळून त्याला पकडून त्याच्याकडून तलवार काढून घेत आरडाओरड केला.

रेल्वे स्थानकात तलवारीसारखे धारदार हत्यार घेऊन वावरणाऱ्या आणि प्रवाशांना धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी निखीलवर गुन्हा दाखल करत त्याला पोलिसांनी अटक केली असून न्यायलयाने त्याला १ सप्टेबर पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचले का?

Back to top button