आरबीआय चा आमिताभ यांच्या जाहिरात मानधनाची माहिती देण्यास नकार | पुढारी

आरबीआय चा आमिताभ यांच्या जाहिरात मानधनाची माहिती देण्यास नकार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

रिझर्व्ह बँकेच्या ( आरबीआय ) विविध जाहिरातीत झळकणारे बॉलिवूडचे अनभिषिक्त शेहेनशाह अमिताभ बच्चन यांचा जाहिरातीसाठी नेमके किती मानधन दिले जाते याची माहिती देण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दर्शवला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते संजय शिरोडकर यांनी बच्चन यांना किती मानधन दिले जाते याची माहिती अधिकारात माहिती आरबीआय कडे मागितली होती. परंतु ती माहिती देण्यास बँकेने नकार दिला. त्यामुळे अपिलात जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. बँकेच्या नियमानुसार अशी माहिती देता येत नाही, असे त्यांना बँकेच्यावतीने सांगण्यात आले.

रिझर्व्ह बँकेत जनतेचा पैसा असतो. साहजिकच करदात्यांच्या पैशातून बच्चन यांना मानधन दिले जाते. त्यामुळे या पैशाचा विनियोग कसा होतो, याची माहिती जनतेला मिळणे आवश्यक आहे. असे शिरोडकर यांचे म्हणणे आहे.

बच्चन हे बॉलीवूडचे अनभिषिक्त सम्राट आहेत. त्याचप्रमाणे जाहिरात क्षेत्रातही त्यांचा दबदबा आहे. विविध व्यावसायिक जाहिरातीत ते झळकत असतात. त्याचप्रमाणे विविध सरकारी जाहिरातीतही ते झळकत असतात. रिझर्व्ह बँकेच्या काही जन प्रबोधनपर तसेच माहितीपर जाहिरातीही त्यांनी केल्या आहेत.

हेही वाचले का?

Back to top button