एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही : कृषी मंत्री अब्दुल सत्तार | पुढारी

एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही : कृषी मंत्री अब्दुल सत्तार

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सेलू तालुक्यातील लोंढापूर, कोल्ही व वर्धा तालुक्यातील सेलसुरा येथे नुकसानीची कृषिमंत्र्यांनी पाहणी केली.  अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या हवालदिल शेतकर्‍यांचे दु:ख त्यांच्या बांधावर जावून पाहिले आहे. ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे असा एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्‍हणाले.

वर्धा जिल्ह्यात जवळपास दोन लाख हेक्टरवर शेतपिकांचे नुकसान झाले आहे. शासन दोन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीला मदत देते. परंतु मुख्यमंत्र्यांनी तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे पंचनामे करून लवकरात लवकर मदतीची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याचे नियोजन आहे. पंचनामे करताना ते बोगस होणार नाही आणि सत्य पंचनामे लपविले जाणार नाही, अशा सूचना केल्या आहे.

त्याप्रमाणे अधिकारी पंचनामे करत आहे. सेलू तालुक्यातील लोंढापूर शिवारात नाल्याच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. लगतच्या कोल्ही-घोराड पांदनीचे झालेले नुकसानदेखील पाहिले. येथे शेतकर्‍यांशी त्यांनी संवाद साधला. अनेक शेतकर्‍यांनी आपले दु:ख यावेळी व्यक्त केले. शेतकर्‍यांनी काही मागण्या केल्या त्या पूर्ण करो असे शेतकऱ्यांना आश्वासन दिले.

वर्धा तालुक्यातील सेलसुरा येथे भदाडी नदीच्या पुरामुळे शेतजमीनी खरडून गेल्याने अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. याची देखील त्यांनी पाहणी केली. तीन विभागातील सात जिल्ह्याची नुकसानीची पाहणी करणार असून त्यानंतर शासनास अहवाल सादर करण्यात येणार आहे असे ते म्‍हणाले.

 १२.३० ची वेळ अन् ४.२० ला आगमन

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या नियोजित दौर्‍याची वेळ १२.३० वाजताची होती. पण, त्यांचे आगमन तब्बल चार तास उशिरा झाले. कृषी मंत्री सत्तार ४.२० वाजता दौर्‍याच्या नियोजित ठिकाणी पोहोचले. तोपर्यंत तेथे उपस्थित सर्वांना ताटकळावे लागले.

हेही वाचा

Back to top button