नितेश राणे, वैभव नाईक यांच्यासह भाजप- शिवसेनेच्या नेत्यांवर गुन्हे दाखल | पुढारी

नितेश राणे, वैभव नाईक यांच्यासह भाजप- शिवसेनेच्या नेत्यांवर गुन्हे दाखल

सिंधुदुर्ग; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत जमावबंदी आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नितेश राणे, वैभव नाईक यांच्यासह भाजप व सेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर कणकवलीत गुन्हे दाखल केले आहेत.

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह ३० ते ४० शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तर भाजप चे आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह ५० ते ६० व्यक्तींवरदेखील गुन्हे दाखल झाले आहेत.

महाराष्ट्र पोलीस कायदा 135, 188, 143 अन्वये गुन्हे दाखल झाले आहेत.

नारायण राणेंची स्थगित झालेली जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारी रत्नागिरी येथून पुन्हा सुरु झाली. ही यात्रा रत्नागिरीतून सिंधुदुर्गमध्ये दाखल झाली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना साथरोग नियंत्रण प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. तसेच जमावबंदीचा आदेशही देण्यात आला होता. मात्र, या आदेशाचे उल्लंघन भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान नारायण राणे यांनी रत्नागिरीत शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना तसेच सरकारवर टीका केली होती.

मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. काही लोकांना सत्तेचा माज आला आहे. आम्ही कायम विरोधात राहू यासाठी जन्माला आलेलो नाही. उद्या राज्यात सत्ता आल्यानंतर पुढे कोणावर कारवाई झाली तर बोंब मारू नका. माझ्या नादाला लागू नका. मी तोंड उघडले तर ते तुम्हाला परवडणार नाही. वेळीच आवर घाला. टप्प्याटप्प्याने तुमची प्रकरणे बाहेर काढू, असा सज्जड इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला दिला आहे.

राज्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. अभिनेता सुशांत सिंह याची आत्महत्या नसून, हत्या झालेली आहे. त्या आरोपींचा शोध घेणे शक्य झालेले नाही. दिशा सालीयन हिचा बलात्कार करून खून करणार्‍या आरोपींनासुद्धा हे सरकार पकडू शकलेले नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. माझ्यावर केलेली कारवाई कायद्याला धरून नव्हती, असे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.

या सरकारने राज्याची पूर्णपणे वाट लावली असून, कोरोनामध्ये राज्याचा एक नंबर आहे. ही राज्याची ख्याती आहे. इथे सभा घेऊ नका, तिथे सभा घेऊ नका. हे फक्त राणेंसाठीच आहे. त्यांना सत्तेचा माज आला आहे. राणेंच्या जास्त पाठी लागू नका. नाहीतर मी तोंड उघडले ना तर तुम्हाला परवडणार नाही. मी टप्प्याटप्प्याने तुमची प्रकरणे बाहेर काढीन, हे लक्षात घ्या, असा इशाराही राणेंनी यावेळी दिला.

मी गुन्हेगार होतो तर….

मी गुन्हेगार होतो तर मी मुख्यमंत्री, आमदार, मंत्री कसा झालो? तुम्हीच मला ही पदे दिलीत ना? असे सवालही उपस्थित केले. ज्यावेळी बाळासाहेबांच्या जीवाला धोका होता त्यावेळी सुपुत्राला सोबत नेण्याऐवजी बाळासाहेबांनी मला सोबत नेले, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

शिवसेनेने कोकणातील जनतेला फसवले आहे. गेल्या दोन वर्षात कोणत्याही प्रकारचा विकास नाही. एवढेच काय तर पालकमंत्रीही बाहेरचा दिला आहे. जिल्ह्यात त्यांचे आमदार नाहीत, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला.

कोकणात आंबा, काजू, कोकम व अन्य फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग आणले जातील. यासाठी महिलांनाही सबसीडीवर कर्ज दिले जाईल. त्याचबरोबर कोकणासाठी अद्ययावत असे ओरोसला उद्योगांसाठी प्रशिक्षण केंद्र मंजूर केले असून, यासाठी 200 कोटी रूपये मंजूर झाले आहेत, असे राणे यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

Back to top button