जळगाव : मंत्रिपद मिळाले आता पालकमंत्री होण्यासाठी चढाओढ | पुढारी

जळगाव : मंत्रिपद मिळाले आता पालकमंत्री होण्यासाठी चढाओढ

जळगाव : राज्यात नवे सरकार स्थापन झाले मात्र आता मंत्रीमंडळ विस्तार रखडल्याने सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर आज शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला. यात जळगाव जिल्ह्याला आता भाजपकडून गिरीश महाजन तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांच्या रुपाने दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहे. आता जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून संघर्ष वाढण्याची चिन्हे आहे. यात पाटील आणि महाजन यापैकी कुणाला पालकमंत्रीपद मिळतं याकडे आता जिल्हावासियांचे लक्ष्य लागले आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रीपद होते. जळगाव जिल्हय़ातून गिरीश महाजन, गुलाबराव पाटील या दोघांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता पालकमंत्री कोण हा प्रश्न उभा ठाकला आहे. जुने पालकमंत्री सरसकट कायम ठेवण्यास भाजपचा तीव्र विरोध आहे. जळगावच्या पालकमंत्रीपदावरून पाटील-महाजन यांच्या गुंतागुंत निर्माण झाली आहे.

गिरीश महाजनांकडे नाशिकची जबाबदारी?
जळगावात जास्त पॉवरफुल्ल कोण हा संघर्ष उभा राहिला आहे. याआधी फडणवीस सरकारमध्ये गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांना मंत्रीपद मिळाले होते. तेव्हाही पालकमंत्री पदावरुन दोन्ही नेत्यांमध्ये ओढाताण झाली होती. एकनाथ खडसेंना जळगाव तर गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळाले होते. यानंतर भोसरी घोटाळ्याच्या आरोपामुळे खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांना जळगावचे पालकमंत्रीपद दिले होते. आता आगामी काळात नाशिक महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांचा नाशिकमधील कामाचा अनुभव लक्षात घेता, त्यांना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपला बळ मिळणार…
जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षाच्या काळात शिवसेना सत्तेत असल्याने त्यातच गुलाबराव पाटील हे मंत्री असल्याने शिवसेनेला उभारी मिळाली होती. आता तर जिल्ह्यातील शिवसेनेचे चारही आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्तेही सैरभैर झाले असून, शिवसेनेला नव्या नेतृत्वाचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यामुळे भाजपला जिल्ह्यात विस्तारण्याची संधी मिळाली आहे. जिल्ह्यात शिंदे गटाआडून शिवसेना संपवून भाजपला आपले बळ वाढवू पाहत आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपला सोयीचे ठरणार आहे.

Back to top button