दक्षिण मुंबई ७० टक्के जाणार पाण्यात; पर्यावरण विभाग जागा झाला | पुढारी

दक्षिण मुंबई ७० टक्के जाणार पाण्यात; पर्यावरण विभाग जागा झाला

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

दक्षिण मुंबई 2050 पर्यंत 70 टक्के दक्षिण मुंबई पाण्याखाली जाणार आहे. तापमान वाढीमुळे मुंबइईची बिकट अवस्था भविष्यात होणार आहे. याबाबत मुंबई वातावरण कृती आराखड्याचे सादरीकरण शुक्रवारी मुंबई महापालिका मुख्यालयातील सभागृहात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  यांच्या समोर करण्यात आले.

गेल्या दोन वर्षांत आलेली चक्रीवादळे, तासाला 100 मिलिमीटरपेक्षा जास्त पडणारा पाऊस, समुद्राला भरती असताना वाढणारी लाटांची उंची, शहरात तुंबून राहणारे पाणी, तापमानामध्ये झालेली वाढ यामुळे 2050 पर्यंत 70 टक्के दक्षिण मुंबई पाण्याखाली जाणार आहे. त्यातही नरिमन पॉईंट, मंत्रालय, कफ परेडमधील 80 टक्केपेक्षा जास्त भाग पाण्याखाली जाणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईला वाचवण्यासाठी आता राज्य सरकारसह मुंबई महापालिका, एमएमआरडीए व अन्य शासकीय व निमशासकीय संस्था यांनी पुढाकार घेतला असून, नोव्हेंबर 2021 पर्यंत मुंबईचा वातावरण कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.

शुक्रवारी मुंबई महापालिका मुख्यालयातील सभागृहात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई वातावरण कृती आराखड्यासंदर्भात सादरीकरण झाले. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दक्षिण मुंबई कुठे, किती पाण्याखाली जाईल याचे चित्रच उभे केले. महानगरपालिकेच्या कुलाबा ए विभाग, डोंगरी बी विभाग, चंदनवाडी सी विभाग व ग्रँट रोड डी विभागतील 70 टक्के भाग पाण्याखाली जाणार आहे. दक्षिण मुंबई वाचवण्यासाठी काहीच वर्षे हाती आहेत.

मुंबई महापालिका आणि वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट इंडिया, सी-40 सिटीजच्या सहकार्याने सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत सविस्तरपणे मुंबई वातावरण कृती आराखडा तयार केला जाणार असून, नोव्हेंबर 2021 मध्ये आराखडा जाहीर केला जाईल आणि त्यावर अर्थातच मुंबईकरांच्या हरकती व सूचना मागवल्या जातील.

कोण, कोठे, किती पाण्यात

  • फोर्ट ए – १९१४५०
  • डोंगरी बी विभाग – १३१७१८
  • चंदनवाडी सी विभाग -१७१९४१
  • ग्रँट रोड ३५८९३३

किनाऱ्यालगतची लोकसंख्या

  • फोर्ट ए विभाग ५८००० / १० वस्त्या
  • ग्रँटरोड डी विभाग ११०००/१० वस्त्या

वातावरण कृती आराखड्यात आता आणखी दिरंगाई झाली तर पुढील दहा वर्षांत मुंबई राहण्यालायक राहणार नाही. वातावरण बदलाचे हे आव्हान हाताळण्यासाठी व्यापक आणि सर्वसमावेशक धोरण तयार करणे, हे या आराखड्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. वातावरण बदलाचे धोके कमी करणारे ठोस, प्रभावी आणि सर्वसमावेशक असे अनुकूल धोरण स्वीकारले जाईल.
– आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री

पर्यावरण विभाग सरसावला

मुंबई शहरातील वातावरणामध्ये गेल्या दहा वर्षांपासून मोठा बदल होत चालला आहे. अवेळी पडणारा पाऊस, चक्रीवादळ, तापमानामध्ये होत असलेली वाढ यामुळे मुंबई शहराचे भवितव्य धोक्यात आले आहे. चार बाजूंनी समुद्राने वेढलेली व सात बेटांवर वसलेली मुंबई, कधी पाण्याखाली जाईल हेच सांगणे कठीण आहे. हे संकट थांबवणे कोणाच्या हातात नाही. या संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी पर्यावरण विभाग सरसावला आहे.

Back to top button