Recipe of dhokla : मऊ आणि स्पंज ढोकळा कसा तयार कराल ? | पुढारी

Recipe of dhokla : मऊ आणि स्पंज ढोकळा कसा तयार कराल ?

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्याहारीला हलक्या-फुलक्या पदार्थांना प्रत्येक जण पहिली पसंती देताना दिसत आहे. त्यात आघाडीवरचा पदार्थ म्हणजे ढोकाळा (Recipe of dhokla). गुजराती राज्याची ओळख असलेला हा पदार्थ आता महाराष्ट्रातही तितकाच आवडीने खाल्ला जात आहे. इ.स. पूर्व १०६६ मधील एका जैन पुस्तकात ढोकळ्याचा दुक्किया असा उल्लेख आढळतो. नंतर त्यात बदल झाले अन् चीज ढोकळा, मिक्स ढोकळा, तूर ढोकळा, रवा ढोकळा, खट्टा ढोकळा, रसिया ढोकळा, खामणं ढोकळा, इथपर्यंत त्याचा प्रवास झाला. आज त्याच ढोकळ्याची रेसिपी आपण समजावून घेऊ…

साहित्य

१) एक वाटी बेसण पीठ चाळून घ्या. दोन चमचे मोठा रवा.

२) एक कप भरून पाणी. एक चमचे पीठी साखर.

३) एक चमचे इनो किंवा बेकिंग पावडर. चवीनुसार मीठ.

४) पाव चमचे हळद, एक चमचे लिंबूचा रस.

५) एक चमचे तेल, एक चमचे मोहरी.

६) तीन-चार कडीपत्त्याची पाने, तीन-चार हिरव्या मिरच्या. चार चमचे साखर.

dhokla

कृती 

१) पहिल्यांदा बाऊलमध्ये बेसण पीठ, मोठा रवा ,पीठी साखर, इनो, मीठ, या सर्वांचे मिश्रण करून घ्या.

२) त्यात पाव चमचे हळद टाकून, पुन्हा ते मिक्स करून घ्या.

३) त्यानंतर थोडं-थोडं पाणी टाकून मिश्रण पातळ करून घ्या. १ चमचा लिंबूच रस टाकून पुन्हा मिक्स करून घ्या.

४) कडईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. तोपर्यंत पसरट डब्ब्याला आतून बाजून तेल लावून घ्या आणि त्यात मिश्रण ओतून घ्या.

५) पाणी गरम झाल्यानंतर डब्ब्याला कडईमध्ये ठेवा. त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफलून घ्या.

६) १० मिनिटांनंतर ढोकळा व्यवस्थित वाफलला की नाही, हे तपासण्यासाठी त्यात चाकू घुसवून बघा. जर त्या चाकूला मिश्रण चिकटलेलं नसेल, तर ढोकळा व्यवस्थित वाफलला आहे. त्याला थंड होण्यासाठी ठेवा.

७) तोपर्यंत तव्यामध्ये एक चमका तेल टाकून गरम होऊ देऊ या. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी, कडीपत्त, ३ -४ हिरव्या कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकून फोडणी टाकून घ्या. त्यात पाणी टाकून १ उकळी येऊ द्या.

८) उकळी आल्यानंतर ४ चमचे साखर टाकून विरगळून घ्या आणि त्यात पाव चमचे लिंबूचा रस, चवीनुसार मीठ टाका.

९) डब्यातील ढोकळा व्यवस्थितरित्या एका ताटात काढून घ्या. त्याला चार-पाच भागामध्ये कापून घ्या. तुमचा खमंग ढोकळा (Recipe of dhokla) तयार झाला.

पहा व्हिडीओ : बटर चिकनची ही रेसीपी खास तुमच्यासाठी…

Back to top button