महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांचे निधन | पुढारी

महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांचे निधन

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र केसरी आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते आप्पालाल शेकबूर शेख (वय 55, रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. कष्टकरी शेतकरी कुटुंबातील आप्पालाल यांनी आपले आयुष्य कुस्तीसाठीच वेचले. महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांच्या निधनामुळे लाल मातीवर प्रेम करणार्‍या कुस्ती शौकिनांत शोककळा पसरली आहे.

आप्पालाल यांचे आई-वडील कष्टकरी शेतकरी कुटुंबातील. वडील शेकबूर हे पाहुण्यांकडे शेतीची कामे करीत हलाखीच्या परिस्थितीत गुजराण करत होते. त्यांनी मुलांना कुस्तीसाठी काही कमी पडू दिले नाही. त्यामुळे आप्पालाल शेख यांच्या कुटुंबाला कुस्तीची आवड लागली. सुरवातील त्यांचे बंधू इस्माईल शेख यांनी कुस्तीला सुरुवात केली. स्थानिक मैदान गाजवत त्यांनी राज्यपातळीवर चमकदार कामगिरी केली. इस्माईल यांनी 1980 मध्ये महाराष्ट्र केसरीपदावर आपले नाव कोरले.

त्यांनी बंधू आप्पालाल यांनाही कुस्तीत चांगले तयार केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आप्पालालही कुस्तीच्या आखाड्यात यशस्वी होत राहिले. 1992 साली आप्पालाल यांनीही महाराष्ट्र केसरी किताबचा मान पटकाविला. तेवढ्यावर न थांबता आप्पालाल यांनी राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये धडक मारली. तेथेही त्यांनी सुवर्णपदक पटकावले.

कुस्तीत मिळालेली पदके आणि मानमर्यादा यामुळे आप्पालाल यांनी आपले अखंड आयुष्यच कुस्तीसाठी आयुष्य वेचले. त्यांच्या पत्नी, रशिदा यांचेही तीन महिन्यापूर्वी कोरोनाने निधन झाले होते.

आप्पालाल शेख यांना काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर सोलापुरात उपचार सुरू होते. उपचार सुरु असतानाच गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत महाराष्ट्र केसरी झालेल्या आप्पालाल यांच्या निधनामुळे राज्यातील कुस्ती शौकिनांतून हळहळ व्यक्‍त होत आहे. त्यांच्या पश्‍चात तीन मुले, मुलगी, तीन भाऊ, पुतणे, पाच बहिणी असा परिवार आहे.

दरम्यान, आप्पालाल शेख यांचे ऑलिंपिक स्पर्धेत विजेतेपदाचे स्वप्न अपुरे राहिले होते. आपल्या मुलांच्या रूपातून ते पूर्ण व्हावे यासाठी ते प्रयत्न करीत होते. त्यासाठी तीनही मुलांना त्यांचा कुस्तीचा कसून सराव घेत होते. सध्या तीनही मुले कुस्ती खेळतात. ऑलिंपिकमध्ये धडक मारून वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा मानस त्यांच्या मुलांनी यावेळी व्यक्‍त केला.

तिघे महाराष्ट्र केसरी असलेले एकमेव घराणे

महाराष्ट्रात अनेक कुस्तीसाठी वाहिलेली अनेक घराणी आहेत. त्यामध्ये काहीजणांनी डबल महाराष्ट्र केसरी, पिता-पुत्र, भाऊ तसेच नातेवाईक असे दोघेजण महाराष्ट्र केसरी आहेत. पण राज्यात एका कुटुंबातील महाराष्ट्र केसरी असलेले आप्पालाल शेख यांचे एकमेव घराणे आहे. बंधू इस्माईल हे 1980 मध्ये महाराष्ट्र केसरी झाले होते. आप्पालाल 1992 मध्ये महाराष्ट्र केसरी झाले, तर 2002 साली मध्ये त्यांचे पुतणे मुन्नालाल शेख हे देखील महाराष्ट्र केसरी झाले.

Back to top button