स्त्रियांचे सण : पूजा अर्चेचा श्रावण | पुढारी

स्त्रियांचे सण : पूजा अर्चेचा श्रावण

डॉ. लीला पाटील, कोल्‍हापूर

ऊन पावसाचा लपंडावाचा खेळ खेळणारा मनोहरी श्रावण. हिरव्या मखमलीचा इंद्रधनुचा गोफ विणणारा हा श्रावण मासात चैतन्याचा, समृद्धीचा, धार्मिक आचारधर्माचा. ऊन-पावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरू राहतो. पूजा-अर्चा, उपास-तापास, प्रवचन-किर्तन, भजन-भक्‍तीगीतांच श्रवणीयता यांच्यात आपल्याला रमविणारा हा श्रावण महिना तसेच स्त्रियांच्या आत्मविश्‍वासाला वाव देणारा श्रावण. मनाचा उल्हास म्हणून श्रावणमास निसर्ग झाडं झुडपं, प्राणी, गाईगुरं, माणसं, समुद्र, व्यापार व्यवहार सगळ्यांचीच सांगड घालतो. या सगळ्यातून प्रेमाचा, आनंदाचा, चैतन्याचा, सूर घुमवत राहतो आणि तो सूर ती मनाची हर्षोत्फुल्‍लता सणाच्या माध्यमाने व्यक्‍त केली जाते जणू. कारण श्रावणमासात सण व्रतवैकल्य यांची रेलचेल, किर्तने, प्रवचन, पूजा, अर्चा, भजनं, सप्‍ताह, बैठका यांच्या आयोजनामुळे धार्मिक व आध्यात्मिक वातावरण निर्माण होत राहते. स्त्रियांच्या उत्साहाला उधाण आणि मनातील भाव प्रकट करण्याला संधी देणार्‍या सणांची चलती वा आयोजन करणारा श्रावण.

श्रावणाच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे शुद्ध पंचमीस नागपंचमी येते. सासरहून माहेरी येणार्‍या तरुणी. उत्साह व आनंद याचे भरतं येतं या सणाला. फुगड्या खेळणं उखाणं घेणं, फेर धरणं, मेंदी लावणं गाणी तीही फेराची व पूर्वपरंपरा व संस्कृतीचा दाखला देणारी. खरे तरी अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य, मोकळीक, घराबाहेर पडून आनंद व्यक्‍त करण्याची संधी देणारी नागपंचमी. या सणादिवशी पूर्वजांनी काही पथ्ये व नियम सांगितले आहेत. तसेच काही विशेष लाभ नागपुजेमुळे होतात याचीही माहिती दिली आहे.

नागपंचमीला नागाला घाला दूध
नागकृपे होईल बुद्धि शुद्ध।
नागपंचमीला नागाला लाह्या फुले
नांदतील सुखाने दोन्ही कुळे।

नाग अथवा सर्प हा प्राणी मित्र, कृषी मित्र व मानवासाठी लाभ देणारा असतो याचे स्मरण नागपंचमी निमित्त केले जाते. सर्पमित्र हे साप कसे उपकारक असतात याबद्दल माहिती देतात. या सणाच्या निमित्ताने त्या व्यक्‍तींना माहिती देण्याची संधी द्यावी. नागपंचमीला काय करू नये स्त्रियांनी, तर-

नागपंचमीला नको चिरू भाजीपाला
आज सये दया शिकवू हाताला
हा मंत्र म्हणजे दया दाखविण्याचा गुण अधोरेखित करणारा आहे.
चला ग सखियांनो, धेऊ झाडावर झोक।
आपुल्या पायी, आकाशाला देऊ धक्के॥

स्त्रियांनी आपले कर्तृृत्व आकाशाला भिडणारे करावे, असा संदेश यातून मिळतो. त्यांचे कर्तृत्व, कामगिरी उंचावत असताना त्याला उभारी मिळावी हेच झोके सांगतात. नागपंचमी दिवशी नागाची पूजा म्हणजे घातक शक्‍ती, विषारी विकारी वासना, याविरुद्धची अध्यात्मिक शस्त्राने केली जाणारी लढाई होय.

नागाला भाऊ मानून स्त्रिया पूजा करतात. गोडधोड खाणं, नवनवं लेणं, झुल्यावर झोके घेणं, मेंदीची कलाकुसर व रंगणं व माहेरवाशिणींनी मनमुराद रंगणं आनंदणं हेच नागपंचमीचं देणं. सुखसमाधानाचा अनुभव या धार्मिक पूजेने मिळतो. प्रतिपदेपासून घरोघरी जिवतीचा कागद लावतात. त्यात मंगळवार व शुक्रवार जिवतीचे महात्म्य. श्रावणी सोमवारी उपवास व श्री शंकराचे दर्शन घेण्याची प्रथा तेही मनोभावे.

बुध बृहस्पती म्हणजे मामा भाचे जेवायला बोलवण्याची पद्धत अनेक घरात आहे. नात्याची जपवणूक व स्नेहवर्धनच हे असे. हमखास उपवास-पूजा अर्चा स्त्रियांकडून. भक्‍तीभाव व श्रद्धेचा हा भाव आणि भाग आहे. रविवार सूर्याचा. श्रावण खरोखरच पवित्र दिवसांचा आणि धार्मिक विधी, विचार, श्रद्धा व भावनांचा मांसाहार वर्ज्य.

मंगळागौर पूजायची लग्‍न झाल्यावर तीही श्रावण महिन्यात. चौथा वा पाचवा मंगळवार येतील त्याप्रमाणे त्या दिवशी मंगळागौरीची पूजा करतात. मैत्रिणी सुवासिनी जमवून हळदी कुंकू कार्यक्रम, श्रावण तर फुलांचे फुलण्याचे दिवस व मंगळागौरीला भरपूर फुले आणि सुवासाची मैफल. सुगंधी, उदबत्त्यांचा सुगंध, निरंजन, समई व फुलवातींचा मंद प्रकाश, फळांची मांडणी आणि गोडधोडाचा नैवेद्य. सगळं कसं मनाला प्रसन्‍न करणारं. मंगळागौर पूजेदिवशी नवलाई किती. साजशृंगार भरजरी वस्त्र नऊवारी साडी व केसांचा खोपा. फुलांचा गजरा. नाकात नथ, कमरेला कमरपट्टा, बाहूला बाजूबंद, दणादण फुगड्या झिम्मा खेळायचा. तरुण नवोदांमध्ये पोक्‍त सुवासिनीही मिसळतात. जुन्यांच्या प्रेमळ आठवणी व नव्यांचे ताजे अनुभवातून गोड गप्पांचा फड. हसणं मनमुराद खरोखरच धार्मिक प्रथा व पूजा करण्याबरोबरच एक प्रकारचे सोशल गेटटूगेदर तेही मौजमस्तीचे. माहेरवाशिणींना फुलविणारे. स्त्रियांचाच हा कार्यक्रम त्यांना जणू मुक्‍त मोकळीक आणि पर्सनल स्पेस.

फुगडी खेळू ये तू ग मी ग सखी
जन्मवेरी राहील ओळखी
फुगडी दणदण दणाणतो सोपा
मैत्री घट्ट पण खेळता सुटे खोपा
किती यथार्थ व सुंदर वर्णन!

खरे तर या मासात नाना व्रते, नावा नेम, कोणी गोपधें काढतात, कोणी लक्ष वाती लावतात, कोणी फुलांची दुवांची लाखोली वाहतात.

श्रावण मासात कुमारिका विवाहिता प्रौढा, ज्येष्ठा या सर्वच वयोगटातील स्त्रियांना सण व्रत वैकल्यात मानाचे स्थान देण्याची उचित व पुरोगामी विचारांची पद्धत अवलंबिलेली आहे, तीही धार्मिक प्रथाची जोड देऊन. त्यामुळे त्यास केवळ वैयक्‍तिक नव्हे तर सामुदायिक, कौटुंबिक, सामाजिक मान्यता लाभलेली आहे. म्हणूनच आजच्या आधुनिक युगात तांत्रिक यांत्रिक ग्लोबल जगात श्रावण मास धार्मिक विधी, लोककथा आणि लोकगीते पूजा पाठ यांच्या अस्तित्व व महत्त्वामुळे खूप हवाहवासा वाटणारा मनाला समाधान देणारा. हर्षोल्हासाचे भरते आणणारा, दयाधर्म व दानत यास महत्त्व देत मोल जाणवून देणारा आहे हेच तर भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. मंगळागौरी यावे शुभंकरी, सोन्याच्या पावली। हेच मागणं व तेच भालणं याच अपेक्षेने मंगळागौरीची साजसाजरी पूजा. संतती लाभावी. सर्वांना दीर्घायुषी लाभावे आरोग्य संपन्‍नता मिळावी म्हणूनच मागणं सौभाग्य अखंड रहावं हीच इच्छा व तशीच प्रार्थना केली जाते.

 

Back to top button