आकाशवाणीचे बीएसएनएल होऊ नये | पुढारी

आकाशवाणीचे बीएसएनएल होऊ नये

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा सोलापूर आकाशवाणीचे संध्याकाळच्या प्रसारणातील कार्यक्रम 1 जुलैपासून बंद झाले आहेत. केंद्र सरकारच्या प्रसारभारतीने कार्यक्रम बंद करून मराठी माणसांवर आणि मराठी अस्मितेवर घाला घातला आहे. पुढे जाऊन सोलापूर आकाशवाणीचे बीएसएनएल होऊ नये, यासाठी सोलापूरकरांनी वेळीच लढा उभारला पाहिजे. प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी कृती समितीच्या बैठकीत अंध श्रोत्यांनी बोलावून दाखवली.

आकाशवाणी बचाव कृती समितीच्यावतीने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात मराठी अस्मितेसाठी आणि आकाशवाणी कार्यक्रम पूर्ववत होण्यासाठी सोलापुरातील लेखक, साहित्यिक, समीक्षक, विचारवंत, कलावंत, कामगारवर्ग आणि आकाशवाणीप्रेमी श्रवणनिष्ठ अशा समाजातील सर्वच घटकांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड, प्रा. एम.आर. कांबळे, रेकॉर्ड कलेक्टर असोसिएशनचे मोहन सोहनी, ज्येष्ठ साहित्य समीक्षक डॉ. राजशेखर शिंदे, विनोद भोसले, प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, डॉ. रवींद्र चिंचोळकर, कवी गिरीश दुनाखे उपस्थित होते.

आकाशवाणी प्रासंगिक उद्घोषक नितीन बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. आकाशवाणी बचाव कृती समितीच्यावतीने मराठी भाषेच्या विकासासाठी, संवर्धनासाठी लढा देणार्‍या अधिकार्‍यांपर्यंत तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या लोकप्रतिनिधींसह भाषाप्रेमी अधिकारी यांना निवेदने देण्याचे ठरले.

Back to top button