संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार | पुढारी

संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार

 

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी वारंवार समन्स बजावून चौकशीला हजर न राहून सहकार्य न केल्याची नोंद करत सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील भांडुप येथील घरावर छापेमारी करत चौकशी सुरू केल्याने राऊत यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ईडीच्या १० अधिकाऱ्यांच्या पथकाने रविवारी सकाळी सात वाजता राऊत यांच्या मुंबईतील भांडुप येथील घरावर छापेमारी केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या घरी शोध मोहीम राबवत राऊत यांच्यासह त्यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि बंधू आमदार सुनील राऊत यांची चौकशी सुरू केली आहे. गेले चार तास ईडीचे अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांना आपल्यासोबत ईडी कार्यालयात नेल्यास त्यांना अटक करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक दाखल!

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात सुमारे ०१ हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. याप्रकरणी मनी लॉंड्रिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ईडी तपास करत आहे. पत्राचाळ पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यांत संजय राऊत यांचे नीकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांची गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनी सहभागी होती. पुढे ही कंपनी त्यातून बाहेर पडली. मात्र, या व्यवहारात कंपनीला मोठा फायदा झाला होता.

प्रवीण राऊत यांना या व्यवहारात मिळालेल्या पैशांतील काही पैसे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याही खात्यात वळविण्यात आल्याचा आरोप आहे. घोटाळ्यातील पैशांतून वर्षा राऊत यांच्या नावाने दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील किहीम येथे भूखंडांची खरेदी करण्यात आल्याचा ठपका ठेवत ईडीने अशा ११.१५ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे.

याच अनुषंगाने ईडीने राऊत यांची यापूर्वी चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने जुलै महिन्यात पुन्हा एकदा चार वेळा चौकशीसाठी समन्स जारी केले होते. यातील एका वेळी राऊत हे चौकशीला हजर राहिले. मात्र, अन्य समन्सला ते अनुपस्थित राहिले. अखेर ईडीने राऊत हे चौकशीला हजर न राहून सहकार्य करत नसल्याची नोंद करत त्यांच्या घरी छापेमारी केली आहे. तर, मध्य आणि पश्चिम मुंबईतील काही ठिकाणी ईडीची पथके छापेमारी करत असल्याचीही माहिती मिळते.

हे ही वाचा:

बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेवून संजय राऊतांनी सांगितले, घोटाळ्याशी माझा…

 मुख्यमंत्री शिंदे, ऐकताय ना…स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर राज्यपालांचा राजीनामा मागा : संजय राऊत

 

Back to top button