बुमराह माझी विकेट घेण्याचा प्रयत्न करत नव्हता : अँडरसन - पुढारी

बुमराह माझी विकेट घेण्याचा प्रयत्न करत नव्हता : अँडरसन

लीड्स : पुढारी ऑनलाईन

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने नुकताचे जसप्रीत बुमराह बाबत एक वक्तव्य केले. दुसऱ्या कसोटीत बुमराह आणि अँडरसन यांच्यात झालेल्या वादामुळे त्याच्या ह्या वक्तव्याची चांगलीच चर्चा होत आहे. अँडरसन विरुद्ध पहिल्या डावात बुमराहने शॉर्ट बॉलचा तुफान मारा करुन त्याला हैरण केले होते.

लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडचा तळातील फलंदाज जेम्स अँडरसनने जसप्रीत बुमराह बाबतची एक गोष्ट सांगितली. त्याने टेलेंडर्स या बीबीसी पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत ज्यावेळी जसप्रीत बुमराहला पहिल्या डावात सामोरे गेलो त्यावेळी काय घडलं हे सांगितले.

अँडरसन म्हणाला की, ‘पहिल्या डावात फलंदाजी करताना गार्डवर मी थोडा गोंधळलो. जे फलंदाज माघारी परतले होते त्यांनी मला खेळपट्टी संथ असल्याचे सांगितले. ज्यावेळी अखूड चेंडू टाकला जात होता त्यावेळी चेंडू संथपणे बॅटवर येत होता. तसेच ज्यावेळी मी फलंदाजीला गेलो त्यावेळी रुटने मला सांगितले की बुमराह आज फार वेगात गोलंदाजी करत नाही आहे. पण, पहिलाच चेंडू ९० मैल प्रतितास वेगाने आला.’

यापूर्वी असे कधी वाटले नव्हते

अँडरसन पुढे म्हणाला ‘त्यानंतर मला यापूर्वी कधी असे वाटले नव्हते. माझ्या कारकिर्दित कधी मला असे वाटले नव्हते. मला वाटले की बुमराह माझी विकेट घेण्याचा प्रयत्न करत नाही आहे. त्याने त्या षटकात १०, ११, १२ चेंडू टाकले. तो नो बॉल वर नो बॉल टाकत होता. तो अखूच टप्प्याचे चेंडू टाकत होते. माझ्या मते त्याने फक्त दोन चेंडू यष्ट्यांवर टाकले. ते मी खेळून काढले.’

जेम्स अँडरसनने बुमराह टाकत असलेले बाऊन्स कसेबसे खेळून काढले. मात्र त्यानंतर पुढच्याच षटकात तो मोहम्मद शमीला विकेट देऊन माघारी परतला. इंग्लंडला पहिल्या डावात छोटी आघाडी घेण्याची संधी मिळाली खरी. पण, प्रत्युत्तरादाखल खेळणाऱ्या भारताने बुमराह आणि शमीच्या नाबाद ८९ धावांच्या भागीदारीमुळे सामन्यावर पुन्हा नियंत्रण मिळवले.

त्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडचा दुसरा डाव १२० धावात गुंडाळत सामना १५१ धावांनी जिंकला. मालिकेत १ – ० अशी आघाडी घेतली.

Back to top button