Presidential Election 2022 : द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा?; राष्ट्रपती पदासाठी आज मतदान | पुढारी

Presidential Election 2022 : द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा?; राष्ट्रपती पदासाठी आज मतदान

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा; देशाच्या राष्ट्रपतिपदासाठी (Presidential Election 2022) आज मतदान होत असून, भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यादरम्यान लढत होईल. या लढतीत मुर्मू यांचे पारडे जड आहे. विरोधी गोटातील अनेक राजकीय पक्षांनी मुर्मू यांना पाठिंबा दिलेला असल्याने त्यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे.

राष्ट्रपती निवडणुकीत संसदेच्या उभय सदनांचे निवडून आलेले खासदार तसेच सर्व राज्यांतील विधानसभांचे निवडून आलेले आमदार मतदान करतात. खासदार आणि आमदारांची एकूण संख्या 4 हजार 800 इतकी आहे. तर या मतदारांची मतसंख्या 10 लाख 86हजार 431 आहे, त्यातील साडेसहा लाखांवर मते मुर्मू यांना पडतील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. निकाल 21 तारखेला जाहीर केला जाणार आहे. नव्या राष्ट्रपतींना 25 तारखेला पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाईल. आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणार्‍या द्रौपदी मुर्मू यांचा या निवडणुकीत विजय झाला, तर त्या देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती ठरतील. याशिवाय देशाच्या दुसर्‍या महिला व पहिल्या आदिवासी राष्ट्रपती बनण्याचा मान त्यांना मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी  मतदानाचा हक्क बजावताना.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदानाचा हक्क बजावताना.

दिल्लीमध्ये संसद भवनात तसेच राज्यांच्या विधान मंडळात राष्ट्रपतिपदासाठी सोमवारी मतदान होईल. दिल्ली आणि सर्व राज्यांतील मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. मुर्मू यांना कोणत्याही आघाडीत सामील नसलेल्या व विरोधी गोटातील अनेक पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या पक्षांत वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल, बसप, अण्णा द्रमुक, तेलगू देसम पार्टी, निजद, शिरोमणी अकाली दल, शिवसेना, झारखंड मुक्‍ती मोर्चा आणि अनेक छोट्या पक्षांचा समावेश आहे. दुसरीकडे, यशवंत सिन्हा यांच्या बाजूने असलेल्या पक्षांत काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस, टीआरएस, सप, आप आदींचा समावेश आहे.
राज्यासाठी विधिमंडळात मतदानाची सोय.

मुंबई : भारताच्या 15 व्या राष्ट्रपतींच्या निवडीसाठी आज (सोमवारी) प्रत्यक्ष मतदान होणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेचे निवडून आलेले खासदार आणि विधानसभेचे आमदार राष्ट्रपतींच्या निवडीसाठी मतदान करतील. महाराष्ट्रातील आमदारांसाठी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात मतदानाची सोय करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक निरीक्षक म्हणून केंद्रातील अतिरिक्‍त सचिव अमित अग्रवाल यांची नियुक्‍ती केली आहे. त्यांनी रविवारी विधानभवनातील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली.

Presidential Election 2022  विरोधी आमदारांना गळास लावण्याचे प्रयत्न

मुंबई : देशाच्या पंधराव्या राष्ट्रपतींसाठी होणार्‍या निवडणुकीत भाजप उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी राज्यातील सत्ताधार्‍यांनी कंबर कसली आहे. राज्यातील दोनशे आमदार मुर्मू यांना मतदान करतील, असा इशारा खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने आपली मते फुटू नयेत, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून विशेष काळजी घेतली जात आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने प्रथमच आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्चपदी पोहोचणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे भाजप आणि सहयोगीअपक्षांचे 113, शिंदे गटाचे 52 आणि शिवसेनेचे 15 असे एकूण 180 आमदार मुर्मू यांच्या बाजूने असल्याचे चित्र आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी दोनशे आमदारांचा दावा केल्याने अतिरिक्‍त वीस मते कुठून येणार, असा प्रश्‍न पडला आहे. सध्या विधानसभेत राष्ट्रवादीचे संख्याबळ 53, तर काँग्रेसकडे 44 आमदार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने फूट पाडण्याची खेळी भाजप आणि शिंदे गटाकडून खेळली जाण्याची शक्यता  आहे.

मतदान करताना केरळ मुख्यमंत्री पिनाराई विजयन.
मतदान करताना केरळ मुख्यमंत्री पिनाराई विजयन.

हेही वाचलंत का?

 

Back to top button