राणे यांच्‍या अटकेचे आदेश; चिपळूणात पोलीस बंदोबस्त वाढविला | पुढारी

राणे यांच्‍या अटकेचे आदेश; चिपळूणात पोलीस बंदोबस्त वाढविला

रत्‍नागिरी; पुढारी वृत्तसेवा : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्‍या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी तक्रार दिली आहे. नारायण  राणे यांना अटक करून न्यायालयासमोर हजार करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. त्‍यांना अटक करण्यासाठी पोलीस पथक चिपळूणकडे रवाना झाले आहे. दरम्‍यान, चिपळुणमध्‍ये पोलिस बंदोबस्‍त वाढविण्‍यात आला आहे. वालोपे येथील रिमझ हॉटेलला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

आ. भास्कर जाधव संगमेश्वरहून रत्नागिरीकडे रवाना

राणे यांना अटक करून न्यायालयासमोर हजार करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. दरम्‍यान, शिवसेनेचे आमदार भास्‍कर जाधव हे संगमेश्वरहून रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत. दरम्‍यान, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी हे नारायण राणे यांच्‍याबरोबर चर्चा करणार असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

चिपळूण बहादूर शेख नाका येथे शिवसैनिक आक्रमक

चिपळूण बहादूर शेख नाका येथे शिवसैनिक आक्रमक झाले. त्‍यांनी नारायण राणे यांचे पोस्टर फाडले. यावेळी किरकोळ दगडफेकही झाली. आक्रमक शिवसैनिकांना पोलिसांनी रोखलं यावेळी शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्‍याने येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

नारायण राणे यांच्यावर केवळ राजकीय सुडापोटी कारवाई : चंद्रकांत पाटील

राजकीय द्वेषापोटी सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय मंत्र्याला अटक होऊ शकत नाही. प्रत्येकाची एक स्टाइल असते. राणेंचीदेखील बोलण्याची एक स्टाइल आहे. त्यात द्वेष नाही. पण केवळ राजकीय सुडापोटी राणेंवर कारवाई केली जात असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

काय म्हणाले होते राणे…

‘किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे, हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला, किती चीड येणारी गोष्ट आहे,’अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती.

हेही वाचलं का?

 

Back to top button