नारायण राणे यांच्यावर केवळ राजकीय सुडापोटी कारवाई : चंद्रकांत पाटील | पुढारी

नारायण राणे यांच्यावर केवळ राजकीय सुडापोटी कारवाई : चंद्रकांत पाटील

मुंबई; पुढारी ऑनलाईन : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी हा गुन्हा दाखल केला असून नारायण राणे यांना अटक करण्यासाठी पोलीस पथक चिपळूणकडे रवाना झाले आहे. राणे यांना अटक करून न्यायालयासमोर हजार करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

अटक करताना प्रोटोकॉल पाळण्याची सूचना पोलीस पथकाला करण्यात आली आहे. आता राणे यांना अटक होते की काय याकडे लक्ष लागून आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी बडगुजर यांनी नाशिक पोलिसांत गुन्हा नोंदविला आहे.

राणे यांच्या अटकेच्या आदेशावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राजकीय द्वेषापोटी सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय मंत्र्याला अटक होऊ शकत नाही. प्रत्येकाची एक स्टाइल असते. राणेंचीदेखील बोलण्याची एक स्टाइल आहे. त्यात द्वेष नाही. पण केवळ राजकीय सुडापोटी राणेंवर कारवाई केली जात असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

राणे यांच्या वक्तव्याने समाजात तेढ, द्वेष निर्माण होऊ शकते, असे राणे यांच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारीत म्हटले आहे.

सायबर क्राईम विभागाचे अधिकारी परोपकारी तसेच बारकुंड यांच्याकडे तक्रार दिली असून त्याआधारे राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांची जीभ घसरल्याने शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. राणे यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक होत असून आज आंदोलन करण्याची शक्यता आहे.

नारायण राणे विरुद्ध शिवसेना असे वाक्युद्ध अधिकच भडकत असल्याचे दिसत आहे. राणे यांची जनआशीर्वाद यात्रा महाडला आहे. तेथे पत्रकारांशी बोलताना राणे यांनी ‘मी असतो तर कानाखाली चढवली असती,’असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

हे ही वाचा : 

पहा व्हिडिओ : काबूल ग्राऊंड रिपोर्ट : तालिबान दहशत अनुभवलेला काबूलचा वालीजान पुढारी ऑनलाईनवर

Back to top button