क्रीडा शिक्षक : २५०० विद्यार्थ्यांसाठी एक क्रीडा शिक्षक, ऑलिम्पिक पदके वाढणार कशी? | पुढारी

क्रीडा शिक्षक : २५०० विद्यार्थ्यांसाठी एक क्रीडा शिक्षक, ऑलिम्पिक पदके वाढणार कशी?

इस्लामपूर : संदीप माने

लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर असणारा भारत ऑलिम्पिकमध्ये मागे का? हा प्रश्न सर्वांना सातवतो. मात्र जे क्रीडा शिक्षक हे भविष्यातील ऑलिम्पिक पदक विजेते घडवणार आहेत, त्यांची पारख करणार आहेत त्यांची अवस्था काय आहे? एकट्या सांगली जिल्ह्यात २०० ते २५० क्रीडा शिक्षक पदे रिक्त आहे.

एका बाजूला जिल्ह्यात राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत, ही अपेक्षा व्यक केली जाते. मात्र वास्तवात अडीच हजार विद्यार्थ्यांसाठी एक क्रीडा शिक्षक असे आश्चर्यकारक चित्र आहे.

शालेय धोरणानुसार प्राथमिक शाळेत क्रीडा शिक्षक पद मंजुर नाही. त्यामुळे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेच्या इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंत क्रीडा शिक्षकच नसल्याचे उघड आहे. प्राथमिक स्तरावर खेळाची कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असताना क्रीडा शिक्षक पदेच भरण्याचे धोरण नाही. यामुळे कौशल्ये असूनही शालेय स्तरावर खेळाडू घडत नसल्याचे विदारक चित्र आहे.

क्रीडा शिक्षकांना विषय शिक्षकही व्हावे लागते

माध्यमिक शाळांत क्रीडा तासिका कमी भरतात. त्यामुळे मुख्याध्यापकांच्या सोयीनुसार शारीरिक शिक्षकांना काम दिले जाते. त्यांना विषय शिक्षकांची भुमिकाही बजावावी लागते. त्यामुळे माध्यमिक स्तरावरही खेळाडूंसाठी क्रीडा शिक्षकांना वेळ देता येत नाही. जिल्ह्यात माध्यमिक शाळांना जोडलेली ८० टक्के कनिष्ठ महाविद्यालये आहेत तेथे माध्यमिक शाळेकडील शारीरिक शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर जेथे ८ ते १० तुकड्या असतील तर तेथे शारीरिक शिक्षणाचे २० तास मंजुर आहेत. त्या ठिकाणी अर्धवेळ शिक्षकांची नेमणूक केली जात आहे. सांगली जिल्ह्यातील पाचच कनिष्ठ महाविद्यालयात पूर्णवेळ क्रीडा शिक्षक, १० ठिकाणी अर्धवेळ क्रीडा शिक्षक आणि इतर कनिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्त्वावर पदे भरली आहेत. इयत्ता ११ वी व १२ वीसाठी आठवड्यातील दोनच शारीरिक शिक्षणाच्या तासिका आहेत.

तासिका तत्वावरील जागा ही रिक्त

त्यामुळे काही ठिकाणी तासिका तत्त्वावरही नियुक्त्या आहेत. तुटपुंजे मानधन मिळत असल्याने त्या जागाही रिक्तच आहेत. महाविद्यालयीन स्तरावर पूर्णवेळ शारीरिक शिक्षकांची पदे भरली आहेत. मात्र बालवयातच खेळाचे धडे मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे शाळेतील क्रीडा शिक्षकांच्या भर्तीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

कोरोना महामारीने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. काही दिवसात शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकाबरोबरच विद्यार्थ्यांची मानसिकता सुधारण्यासाठी खेळ महत्त्वपूर्ण भुमिका बजावणार आहे. मात्र क्रीडा शिक्षकांची उणीव प्रकर्षाने जाणवणार आहे.

८४-८५ च्या शासन आदेशाची अंमलबजावणी तरी करा…

वयाच्या ६ व्या वर्षापासून बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकासही होणे गरजेचे आहे. मात्र प्राथमिक शाळांमध्ये शारीरिक शिक्षकाचे पद मंजुर नसल्याने मुलांचा शारीरिक विकासाचे धडे दिले जात नाहीत.

सन १९८४-८५ च्या शासन आदेशात २५० विद्यार्थ्यांसाठी एक क्रीडा शिक्षक अशी तरतूद करण्यात आली आहे. मात्र या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. माध्यमिक स्तरावर ४० विद्यार्थ्यांपाठीमागे एक विषय शिक्षक असे धोरण आहे.

मुलांची बौद्धिकतेबरोबर खेळाने शिक्षणात आवड निर्माण होते. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, तामिळनाडू, केरळ राज्यात प्राथमिक स्तरापासूनच खेळाचे धडे दिले जातात. त्या ठिकाणी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडत आहेत.
– बी.के.माने, राज्य उपाध्यक्ष, शारीरिक शिक्षण व क्रीडा संघटना

Back to top button