नाशिक : डॉ. वैशाली झनकर-वीर यांना ८ लाखाच्या लाच प्रकरणात जामीन | पुढारी

नाशिक : डॉ. वैशाली झनकर-वीर यांना ८ लाखाच्या लाच प्रकरणात जामीन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर – वीर यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. या शर्तीमध्ये दर आठवड्याला एकदा त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

शिक्षण संस्थेतील शिक्षकांना अनुदानित वेतन नियमित करण्यासाठी ८ लाख रुपयांची लाच घेताना माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर – वीर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. तसेच त्यांच्यासह प्राथमिक शिक्षक पंकज दशपूते, शासकीय वाहनचालक ज्ञानेश्वर येवले यांनाही अटक झाली होती. त्यापैकी दशपूते व येवले यांना न्यायालयाने गुरुवारी (दि.१९) जामीन दिला होता.

तर डॉ. वैशाली झनकर – वीर यांना पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान, तपासात डॉ. झनकर यांनी सहकार्य न केल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला होता. तसेच डॉ. झनकर या जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याने न्यायालयाने रुग्णालयाकडे अहवाल मागितला होता. त्यामुळे रुग्णालयाने लागलीच डॉ. झनकर यांची तब्येत चांगली झाल्याचा अहवाल देत डिस्चार्ज दिला.

त्यानंतर झनकर – वीर यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. सोमवारी (दि.२३) जामीन अर्जावर सुनावणी झाली. यात सरकारी पक्षातर्फे ऍड. सचिन गोरवाडकर यांनी जामीन अर्जास जोरदार विरोध दर्शवला. युक्तीवाद करताना सर्वोच्च न्यायालयातील तीन खटल्यांचा आधार दिला. जामीन अर्जास मंजुरी मिळाली तर तपासासवर परिणाम होणे, पुराव्यांची छेडछाड, अधिकारपदाचा गैरवापर करून साक्षिदारांवर दबाव टाकणे आदी प्रकार होण्याची शक्यता सरकारी पक्षाने व्यक्त केली.

बचावपक्षातर्फे ॲड. अविनाश भीडे यांनी युक्तीवाद करताना हे मुद्दे खोडून काढले. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने झनकर यांना जामीन मंजुर केला. २५ हजार रूपयांचा बॉण्ड आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात आठवड्यातून एकदा हजेरी लावण्याची अट झनकर यांना घालण्यात आली.

दरम्यान, सोमवारच्या सुनावणीसाठी झनकर यांना न्यायालयात हजर करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे जामीनावरील सुनावणीनंतर न्यायालयाची रिलीज ऑर्डर मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आली.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ :  वाडा पावा खाल्ल्यानंतर मुंबईकरांचा दिवस सार्थकी लागतो असं म्हणतात

Back to top button