नाशिक : हरिहर गडावर 17 जुलैपर्यंत वीकेण्डला पर्यटनास बंदी | पुढारी

नाशिक : हरिहर गडावर 17 जुलैपर्यंत वीकेण्डला पर्यटनास बंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अतिगर्दी तसेच संततधारेमुळे अपघाताच्या शक्यतेने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर गड आणि परिसरात पर्यटकांना 17 जुलैपर्यंत वीकेण्डला पर्यटनास बंदीचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. वरुणराजाच्या कृपेने त्र्यंबकेश्वर तालुका हिरवाईने नटला आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनासह परिसराला पर्यटकांकडून पसंती दिली जाते. गेल्या आठवड्यात कळसूबाई-हरिश्चंद्र अभयारण्यातील कळसूबाई शिखर परिसरातील बारीमध्ये शेकडो पर्यटक अडकले होते. स्थानिक यंत्रणांच्या सतर्कमुळे सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली होती. तेव्हापासून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्याच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चिला जात होता.

दरम्यान, नाशिक पश्चिम वनविभागाने हरिहर किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी नियंत्रणासाठी ई-प्रणाली कार्यान्वित करणार आहे. मात्र, त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे गर्दी नियंत्रणासाठी 50 पर्यटकांचा गट टप्प्याटप्प्याने किल्ल्यावर पाठविण्याचा निर्णय घेतला होता. तरीदेखील मागील वीकेण्डला पर्यटकांची विक्रमी गर्दी झाल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पर्यटन बंदीवर वनविभागाने शिक्कामोर्तब केले आहे.

पावसामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून हरिहर गडावर जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करून हरिहर गड परिसरात प्रवेश करणार्‍या पर्यटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
– राजेश पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, त्र्यंबकेश्वर

हेही वाचा :

Back to top button