पुण्यात बिर्याणीवरून राडा; हॉटेल मालकासह कामगारावर वार

Crime

पुणेः पुढारी वृत्तसेवा

बिर्याणी वरून झालेल्या वादात टोळक्याने हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करत हॉटेल मालक व कामगारावर लोखंडी धारधार हत्याराने वार करत खूनाचा प्रयत्न केला. हा प्रकार शनिवारी दुपारी चारच्या सुमारास धायरीतील गारवा बिर्याणी हॉटेलमध्ये घडला. मयूर मते (वय 33) आणि इसराफील, अश्फाक अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी मते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिंहगड पोलीस ठाण्यात टोळक्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघा संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरीतील गणेशनगरमध्ये मयूर यांचे गारवा बिर्याणी हॉटेल आहे. शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दोघेजण बिर्याणी घेण्यासाठी आले होते. दरम्यान त्यावेळी मते हे जेवन करत होते. आरोपींनी बिर्याणीची मागणी केली त्यावेळी दुसरा कामगार तंदूर भट्टीवर काम करत होता. त्यामुळे त्याने बिर्याणीसाठी थांबण्याची आरोपीला विनंती केली. त्यावरून त्याने शिवीगाळ केली.

मते यांना हा प्रकार ऐकू आल्यानंतर त्यांनी आरोपींना महिला ग्राहक आहेत असे म्हणत शिवीगाळ न करण्याची विनंती केली. त्यातून त्यांच्यात किरकोळ कारणातून वादावादी झाली होती. त्याचा राग आल्यामुळे संबंधिताने इतर साथीदारांना बोलावून हॉटेलमध्ये प्रवेश केला. टोळक्याने हत्यार काढून मयूर यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

मात्र, कामगार इसराफील मध्ये पडल्यामुळे त्याच्या डाव्या हातावर वार झाला. त्यानंतर टोळक्याने पुन्हा मयूरवर वार करून जखमी केले. त्यांच्या हॉटेलमधील बिर्याणीचे पातेले, झाकणे, खुर्च्या, ट्रे फेकून मयूर आणि त्यांचे कामगार अश्फाक व इसराफील यांना मारून जखमी केले. तसेच हॉटेलबाहेर जमलेल्या लोकांना आणि आजूबाजूच्या दुकानदारांना शिवीगाळ करून दहशत निर्माण केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिपक खेडेकर करीत आहेत.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने घेतला गळफास

Exit mobile version