पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी; शाळांना सुटी | पुढारी

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी; शाळांना सुटी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली असून, जुलै महिन्याची सरासरी 14 दिवसांतच गाठली आहे. जिल्ह्यात सरासरी पेक्षा 34 टक्के पाऊस जास्त झाला आहे. जिल्ह्यातील जलमय परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील शाळांना उद्या (गुरुवारी) एक दिवस, तर ग्रामीण भागात पाच तालुके वगळून गुरुवार (दि.14) ते शनिवार(दि.16)पर्यंत 1 ली ते 12 वीच्या वर्गांना सुटी जाहीर केली आहे.बुधवारी जिल्ह्यात इंदापूर, वेल्हे, पानशेत, वरसगाव, खेड या तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे रस्ते खचले. त्यामुळे अनेक ठिकाणी गारठून गेलेल्या जनावरांनाही हलवावे लागले. ठिकठिकाणी पर्यटक अडकले होते.

त्यांना सुखरूप ठिकाणी हलविण्यात आले आहे. खेड तालुक्यातील वाशेरे गावात अनेक घरांची पडझड झाली. शिक्रापूर येथे एक घर कोसळून तीन जण जखमी झाले. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्येही बुधवारी संततधार पावसाने दाणादाण उडवून दिली. अनेक भागांत झाडपडी झाली, तर शहरातील नदीपात्राच्या भागात अनेक घरांत पाणी शिरल्याने अग्निशामक दलाला दिवसभर काम लागले होते. जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आल्यामुळे शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका भागातील शाळांना एक दिवस तर ग्रामीण भागात काही तालुके वगळून शनिवार (दि.16) पर्यंत प्रशासनाकडून सुटी जाहीर करण्यात आली आहे. पुणे महापालिका हद्दीतील क्षेत्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

त्यामुळे पुणे महापालिका क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सर्व महापालिका आणि खासगी शाळांना तसेच अनुदानित, विना अनुदानित, अंशतः अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळांना गुरुवारी (दि.14) पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून सुटी जाहीर करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनीही गुरुवारी शाळा बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. ग्रामीण भागातील पाच तालुके वगळता अन्य तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या तसेच इतर सर्व पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना गुरुवार (दि.14) ते शनिवार (दि.16) पर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत. जिल्ह्यात सध्या सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे.

घाट परिसरात अतिवृष्टी झाली असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार बुधवार व गुरुवार अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत अनुचित घटना घडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, पुंरदर, दौंड व शिरूर हे पाच तालुके वगळून इतर तालुक्यांमध्ये 1 ते 12 वीच्या सर्व शाळांना शनिवारपर्यंत (ता. 16) सुटी देण्यात आली आहे. मात्र, या शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कार्यालयीन वेळेत हजर राहून आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे लागेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Back to top button